बॅनर न्यूज

भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे अडचणीत?; मतदारसंघात आयोजित आखाड पार्टीच्या खर्चाची ईडीमार्फत चौकशीची भाजपच्याच पदाधिकाऱ्याची मागणी

Spread the love
पिंपरी : भोसरी विधानसभा मतदारसंघात कोट्यवधी रुपये खर्च करून साजरा करण्यात येणाऱ्या आखाड पार्टीच्या खर्चाची आर्थिक गुन्हे शाखा आणि ईडीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे चिटणीस सचिन काळभोर यांनी केली आहे. विशेष म्हणजे भाजपचेच आमदार महेश लांडगे मित्र परिवाराच्या वतीने या आखाड पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. भोसरी मतदारसंघात अनेक समस्या असताना दुसरीकडे शेकडो कोंबड्या, बकरी आणि बोकडाची कत्तल करून आखाड पार्टी साजरे करणे म्हणजेच आमदार महेश लांडगे यांचे हिंदुत्व आहे का?, असा सवाल सचिन काळभोर यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आमदार महेश लांडगे अडचणीत आले असून, आखाड पार्टीसाठी खर्च कुठून येतो हे शोधून काढण्यासाठी सत्ताधारी भाजप आखाड पार्टीच्या खर्चाची ईडीमार्फत चौकशी करून लोकशाहीत न्याय सर्वांना सारखा आहे हे जनतेला दाखवून देणार का? याकडे पिंपरी-चिंचवडकरांचे लक्ष लागले आहे. 
 
यासंदर्भात पिंपरी-चिंचवड भाजपचे चिटणीस सचिन काळभोर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्याकडून ३८ ठिकाणी मांस-मटण आखाड पार्टी जेवण ठेवण्यात आले आहे. संपूर्ण भोसरी विधानसभा मतदारसंघात ही आखाड पार्टी होणार आहे. त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. हा कोट्यवधींचा खर्च येतो कुठून याची संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात चर्चा होत आहे. दुसरीकडे भोसरी विधानसभा मतदारसंघात बकालपणा वाढला आहे. अनेक विकासकामे रखडली आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करूनही या विकासकामांना दर्जा नाही. निगडी येथील पीसीएमसी कॉलनी इमारत जीर्ण झाली आहे. येथे राहणारे ७७४ कुटुंब जीव मुठीत घेऊन राहत आहेत. त्यांचे पुनर्वसन केले जात नाही. निगडी येथील सेक्टर क्रमांक २२ मध्ये जेएनएनयुआरएम अर्तंगत घरकुल इमारत बांधूनही ९२० पात्र कुटुंबांना घरांचे वाटप केले जात नाही.
भाजपचीच माजी नगरसेविका सीमा सावळे यांनी या घरांवर उच्च न्यायालयाची स्थगिती आणली आहे. आमदार महेश लांडगे यांना भोसरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणून या ९२० कुटुंबांचे काही देणेघेणे असते, तर त्यांनी या कुटुंबियांच्या वतीने उच्च न्यायालयात धाव घेऊन स्थगिती उठवायला हवी होती. लोकांच्या भल्यासाठी खर्च करण्याचे सोडून संपूर्ण भोसरी विधानसभा मतदारसंघात आखाड पार्टी आयोजित करून त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करायला आमदार महेश लांडगे आणि त्यांच्या मित्र परिवाराकडे पैसे आहेत. हे कोट्यवधी रुपये आले कोठून याची चौकशी व्हायला हवी. हिंदुत्वामध्ये अशा प्रकारे शेकडो कोंबड्या, बकरी आणि बोकडांचे बळी देऊन आखाड पार्टी साजरी करण्याची पद्धत नाही. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणारे आमदार महेश लांडगे यांचा दुसरा चेहरा या आखाड पार्टीच्या निमित्ताने समोर आला आहे.
छत्रपती संभाजी महाराजांचा मोशी येथे भव्यदिव्य पुतळा उभारण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार भोसरी मतदारसंघात झालेला आहे. तोच पैसा आखाड पार्टीसाठी वापरला जात असेल, तर ही स्वतःला हिंदुत्व म्हणवून घेणाऱ्या प्रत्येकाला ही लाज वाटणारी आणि चीड आणणारी बाब आहे. या संपूर्ण प्रकरणाची पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गंभीरपणे दखल घ्यायला हवी. भोसरी विधानसभा मतदारसंघात आयोजित करण्यात येणाऱ्या आखाड पार्टीवर जो काही कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे, त्याची आर्थिक गुन्हे शाखा आणि ईडीमार्फत चौकशी व्हायला हवी. या देशात लोकशाही असून, सर्वांना समान न्याय आहे हे दाखवून द्यायचे असेल, तर भोसरी मतदारसंघातील आखाड पार्टीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सचिन काळभोर यांनी केली आहे.
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button