पिंपरी ते निगडी मेट्रोसाठी रस्ता रुंदीकरण न करण्याची सचिन काळभोर यांची मागणी
निगडीतील भूमीपुत्रांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घातले साकडे

पिंपरी : पिंपरी ते निगडी मेट्रो प्रकल्पासाठी निगडी येथे ६१ मीटर रस्ता रुंदीकरण केले जाणार आहे. यापूर्वीही निगडी ते दापोडी रस्त्याचे तीन ते चारवेळा रस्ता रुंदीकरण केले गेले आहे. आता पुन्हा निगडी येथे मेट्रोसाठी रस्त्याचे रूंदीकरण केल्यास स्थानिक भूमीपूत्र बेघर होणार आहेत. त्याविरोधात पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे चिटणीस सचिन काळभोर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घालून मेट्रो प्रकल्प आहे तेवढ्याच जागेतून करावा. या प्रकल्पासाठी पुन्हा रस्ता रुंदीकरण करून भूमीपुत्रावर अन्याय करू नये, अशी मागणी काळभोर यांनी पंतप्रधानांकडे केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरूवारी (दि. २६) पुणे दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते सिव्हील कोर्ट ते स्वारगेट या मेट्रो मार्गाचे उद्घाटन होणार आहे. या पार्श्वभूमीवर सचिन काळभोर यांनी पिंपरी ते निगडी मेट्रो प्रकल्पासाठी रस्ता रुंदीकरण केल्यास तीव्र विरोध करण्याचा इशारा दिला आहे.
यासंदर्भात सचिन काळभोर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे, “राज्य सरकार व पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने यापूर्वी रस्ता रूंदीकरणासाठी वेळोवेळी निगडी येथील भूमीपुत्रांच्या जमिनी ताब्यात घेतल्या आहेत. त्याबदल्यात भूमीपुत्रांना अल्प मोबदला देण्यात आला आहे. २००३ मध्ये निगडी ते दापोडी रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. त्यावेळी निगडी येथील १३२ व्यापारी बेघर झाले. रस्त्याने बाधित भूखंडाच्या मोबदल्यात पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून भूखंड देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार प्राधिकरणाने निगडी व्यापारी संघटनेला ३८ गुंठे जमीन मंजूर केले होते. त्यासाठी संघटनेने २८ ऑक्टोबर २००६ रोजी प्राधिकरणाकडे १० लाख रुपये जमा केले होते.
त्यानंतर आजतागायत निगडी व्यापारी संघटनेकडे जमीनीचा ताबा देण्यात आलेला नाही. असे असताना आता पुन्हा पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गासाठी रस्ता रुंदीकरण केल्यास अनेक भूमीपुत्रांच्या जमिनी जाणार आहेत. आधीच्याच जमिनींचा मोबदला मिळालेला नसताना आता पुन्हा रस्त्यासाठी जमीन ताब्यात घेतल्यास स्थानिक भूमीपुत्र देशोधडीला लागणार आहेत. या प्रकरणाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने दखल घेऊन पिंपरी ते निगडी मेट्रो प्रकल्पासाठी रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येऊ नये. तसेच निगडी व्यापारी संघटनेला आधीच्या भूखंडांच्या बदल्यात जमीन देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मात्र आजतागायत निगडी व्यापारी संघटनेस जमीन भूखंड देण्यात आलेला नाही. त्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीनी ताबडतोब दखल घेऊन रस्ता रुंदीकरणामधील बाधितांना जमीन भूखंड देण्यात यावा. तसेच नव्याने पिंपरी ते निगडी मेट्रो रेल्वे प्रकल्प काम सुरू करण्यात आले आहे. त्याठिकाणी रस्ता रुंदीकरण करण्यात येवू नये, अशी आग्रही मागणी सचिन काळभोर यांनी केलेली आहे.”