बॅनर न्यूज
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोवर भाजप आमदार महेश लांडगे यांची सही; आंबेडकरी बांधवांमध्ये संतापाची लाट

पिंपरी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या जाहिरातबाजीत भोसरी मतदासंघाचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी केलेल्या एका चुकीमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील आंबेडकरी बांधवांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. एका जाहिरातीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रावर आमदार महेश लांडगे यांची सही वापरण्यात आली आहे. ही जाहिरात शहरातील विविध भागात तसेच शेकडो रिक्षांवर करण्यात आली आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रावर स्वतःची स्वाक्षरी छापून बडेजाव मिरवला, लांडगे तुम्ही इतके मोठे नाही झालात की बाबासाहेबांच्या प्रतिमेवर सही करावी, अशा शब्दांत आंबेडकरी बांधवांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार महेश लांडगे यांच्याकडून गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी सुरू आहे. स्वच्छतागृहांपासून ते अगदी टीव्ही चॅनेलवर सुद्धा आजही महेश लांडगे यांच्या जाहीराती सुरू आहेत. हे करत असताना त्यांनी शहरातील एकही चित्रपटगृह सुद्धा सोडलेले नाही. आमदार म्हणून केलेल्या विकासकामांची ही जाहिरातबाजी आहे. त्यातील अनेक कामे आजही पूर्ण नाहीत. तरीही आमदार महेश लांडगे यांनी कामे केल्याचा दावा जाहिरातबाजीतून सुरू आहे. मात्र कामे केली असतील, तर एवढी जाहिरातबाजी करण्याची गरज काय पडली असा प्रश्न भोसरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना पडला आहे. मात्र आता ही जाहिरातबाजी करताना आमदार महेश लांडगे यांच्याकडून एक मोठी चूक घडली असून, त्यांना याची राजकीय किंमत मोजावी लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
आमदार महेश लांडगे यांनी संविधान भवन निर्माणाची एक जाहिरात केली आहे. या जाहिरातीत महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र आहे. तसेच आमदार महेश लांडगे यांचेही छायाचित्र या जाहिरातीत आहे. विचार लोकशाहीचा..अभिमान संविधानाचा ही टॅगलाईन वापरून केलेल्या या जाहीरातीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रावर आमदार महेश लांडगे यांची स्वाक्षरी छापण्यात आली आहे. ही जाहिरात शहरातील विविध भागात आणि शेकडो रिक्षांवर करण्यात आली आहे. रिक्षावर करण्यात आलेली ही जाहिरात पाहिल्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील आंबेडकरी बांधवांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रावर स्वतःची स्वाक्षरी छापून बडेजाव मिरवला, लांडगे तुम्ही इतके मोठे नाही झालात की बाबासाहेबांच्या प्रतिमेवर सही करावी, अशा शब्दांत आंबेडकरी बांधवांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. या जाहिरातीसह आंबेडकरी बांधव सोशल मीडियावर पोस्ट करून आमदार महेश लांडगे यांच्या या कृतीचा जाहीर निषेध व्यक्त करू लागले आहेत. त्यामुळे आमदार महेश लांडगे यांच्या अडचणी वाढल्या असल्याचे चित्र आहे.
यासंदर्भात आंबेडकरी चळवळीतील धम्मराज साळवे म्हणाले, “भाजपने आजपर्यंत महामानव व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने देशातील बहुजन समाजाची कायम फसवणूक केली आहे. दिल्लीत संविधानाची प्रत जाळण्यात आली. त्यावर भाजपने आजपर्यंत कधीही तोंड उघडले नाही. भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी गेल्या निवडणुकीत देशातील पहिले संविधान भवन उभारण्याचे पिंपरी-चिंचवड शहरातील बहुजन समाजाला गाजर दाखविले होते. आता पुन्हा त्याच मुद्द्यावर निवडणूक लढवून बहुजनांची पुन्हा फसवणूक करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हे करीत असताना जागतिक स्तरावर पुजले जाणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोवर आमदार महेश लांडगे यांनी स्वतःचे नाव टाकले आहे. हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान आहे. याप्रकरणी भाजपने आणि आमदार महेश लांडगे यांनी तत्काळ बहुजन समजाची माफी मागावी. अन्यथा ज्या ज्या ठिकाणी ही जाहिरात लावण्यात आली आहे ती रिक्षा असो की अन्य काहीही ती आम्ही फोडून टाकू, असा इशारा त्यांनी दिला आहे.