बॅनर न्यूज
चिंचवड मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात घमासान
शहराध्यक्ष तुषार कामठे की पडलेल्यांना उमेदवारी मिळणार?

पिंपरी : विधानसभा निवडणुकीसाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून नाना काटे, राहुल कलाटे व भाऊसाहेब भोईर यांच्या नावाची शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. मात्र या तिघांनाही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात स्थानिक पातळीवर प्रचंड विरोध असल्याची माहिती आहे. हे तिघेही यापूर्वीच्या निवडणुकीतील पराभूत उमेदवार आहेत. तसेच या तिघांमध्ये पक्ष संघटनेला बळ देऊन पुढे घेऊन जाण्याचे नेतृत्व कधीच दिसले नाही. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी भविष्याचा विचार करून पडलेल्यांना संधी देण्याऐवजी पक्षाच्या पडत्या काळात मजबुतीने पक्षाला पुढे घेऊन जणारे शहराध्यक्ष तुषार कामठे यांना उमेदवारी देण्याची मागणी पक्षात जोर धरू लागली आहे. त्यामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात तिढा वाढला आहे. बाहेरच्या उमेदवाराला संधी दिल्यास पक्ष संघटनेत नाराजी वाढून त्याचा निवडणुकीत महायुतीला फायदा होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. हे टाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शहराध्यक्ष तुषार कामठे यांनाच निवडणुकीच्या मैदानात उतरविणार का?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघात भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप हे महायुतीचे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीकडून त्यांना कोण टक्कर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीत चिंचवड विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट लढणार असल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून चिंचवड मतदारसंघात नाना काटे, राहुल कलाटे, भाऊसाहेब भोईर यांची नावे चर्चेत आहेत. मात्र हे तिघेही पक्षाबाहेरचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाल्यानंतर नाना काटे आणि भाऊसाहेब भोईर यांनी अजित पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. तसेच राहुल कलाटे हे शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत. सध्या ते कोणत्या राजकीय पक्षात आहेत याबाबत संभ्रमावस्था आहे. कलाटे यांचे पाय सर्वच राजकीय पक्षांच्या दगडावर असल्याचे चित्र आहे.
नाना काटे, राहुल कलाटे आणि भाऊसाहेब भोईर हे तिघेही यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीतील पराभूत उमेदवार आहेत. नाना काटे यांचा दोनवेळा, राहुल कलाटे यांचा तीनवेळा आणि भाऊसाहेब भोईर यांचा एकदा विधानसभा निवडणुकीत पराभव झालेला आहे. चिंचवड विधानसभेसाठी दीड वर्षापूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत राहुल कलाटे यांचे डिपॉझीट जप्त झाले होते. त्यामुळे या तिघांपैकी कोणीच भाजपचा पराभव करू शकणार नाही, असे सध्याचे राजकीय चित्र आहे. तसेच यांच्यापैकी एकाला कोणालाही शरद पवार गटाची उमेदवारी मिळाली तरी बंडखोरी होणार हे निश्चित आहेत. त्याचप्रमाणे या तिघांमध्ये पक्ष संघटनेला उभारी देण्याची क्षमता नाही. महापालिका निवडणुकीत स्वतःची ताकद वापरून पक्षाचे १५ ते २० नगरसेवक निवडून आणतील, अशीही शक्यता नाही. याउलट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे हे विरोधकांच्या चुकीच्या कारभारावर तुटून पडणारे नेते म्हणून झपाट्याने पुढे आले आहेत.
थेट अजित पवार यांना जाब विचारण्याची हिंमतही अनेकदा तुषार कामठे यांनी दाखविली आहे. महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांवर विविध आंदोलने करून तुषार कामठे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये चैतन्य निर्माण केल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस २०१७ पासून पिंपरी-चिंचवडमध्ये विरोधी पक्ष म्हणून काम करीत आहे. तुषार कामठे हे शरद पवार गटाचे अध्यक्ष झाल्यापासून गेल्या वर्षभरात जेवढी आंदोलने झाली तेवढी गेल्या सात वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध असूनही झाली नव्हती, हे राजकीय वास्तव आहे. नाना काटे, भाऊसाहेब भोईर यांच्यासारखे मातब्बर समजले जाणारे नेते असतानाही राष्ट्रवादीची अवस्था गलितगात्र होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर अजित पवार यांच्या भितीने शरद पवार गटाचे शहराध्यक्षपद घेण्यास कोणीही पुढे येत नसताना तुषार कामठे यांनी धाडसाने पुढे येत शहराध्यक्षपद स्वीकारले. त्यानंतर तुषार कामठे यांनी शहराच्या राजकारणात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच मुद्देसूद बोलून धाडसी निर्णय घेणारे नेतृत्व म्हणून तुषार कामठे नावारुपाला आले आहेत.
या सर्व राजकीय पार्श्वभूमीवर चिंचवड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाची उमेदवारी बाहेरच्यांना देण्यास पक्षातच तीव्र विरोध होत आहे. त्यातच शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी राहुल कलाटे यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरल्याचे सांगितले जात आहे. स्वतःच्या लोकसभा मतदारसंघात येत नसतानाही खासदार कोल्हे चिंचवड विधानसभा निवडणुकीसाठी तीनवेळा पडलेल्या उमेदवारासाठी आग्रह धरत असल्याने पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात नाराजी पसरली आहे. त्यातून आता शहराध्यक्ष तुषार कामठे यांनाच चिंचवडच्या निवडणूक रणसंग्रामात उतरविण्याची मागणी पक्षात जोर धरू लागली आहे. बाहेरच्या उमेदवारांना पायघड्या घालूनही ते नंतर पक्षाशी बेईमानी करून कधीही उड्या मारू शकतात. तसेच बाहेरून येणारे हे विरोधकांसोबत अंडरस्टँडींग करून राजकारण करणारे नेते आहेत. अशावर विश्वास ठेवून पक्षाने कार्यकर्त्यांचा विश्वासघात करण्यापेक्षा शहराध्यक्ष तुषार कामठे यांनाच चिंचवडमधून उमेदवारी द्यावी, अशा आग्रह धरला जात आहे. त्यामुळे चिंचवड मतदारसंघातील उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात तिढा वाढला असून, शहराध्यक्ष तुषार कामठे यांना तिकीट मिळणार की ऐनवेळी बाहेरून येणाऱ्यांना तुतारी फुंकायला सांगितली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.