बॅनर न्यूज
पिंपरी मतदारसंघात झोपडपट्टीतील मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न; माजी नगरसेविका सीमा सावळे यांचा प्रताप
पाच वर्षापूर्वी आणलेल्या निकृष्ट साड्या आणि शर्ट व पॅन्ट पीसचे वाटप केल्याने गोरगरीब व्यक्त करताहेत संताप

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता असताना सर्वाधिक भ्रष्टाचाराचा आरोप झालेल्या स्थायी समितीच्या माजी सभापती सीमा सावळे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी विधानसभा मतदारसंघातील विविध झोपडपट्ट्यांमध्ये साडी आणि शर्ट व पॅन्ट पीस वाटपाचा धडाका लावला आहे. वाटपावेळी काही ठिकाणी गोरगरीब झोपडीधारकांनी सीमा सावळे यांना अक्षरशः हाकलून लावले आहे. तसेच मिळालेली साडी आणि शर्ट व पॅन्ट पीस निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आल्याने गोरगरीब झोपडीधारक सीमा सावळे यांना आता शिव्यांची लाखोली वाहत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे सीमा सावळे यांनी पाच वर्षापूर्वी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविताना तेथील मतदारांना वाटपासाठी आणलेल्या या साड्या असल्याचे सांगितले जात आहे. तेव्हापासून तब्बल पाच वर्ष कुजत पडलेल्या साड्या आता वाटल्या जात असल्याने पिंपरी मतदारसंघातील गोरगरीब महिला संताप व्यक्त करीत आहेत. सीमा सावळे यांनी आता निवडणुकीला कोणत्याही राजकीय पक्षाकडून उभे राहावे. त्यांचे पुन्हा एकदा डिपॉझीट जप्त करायला लावू, अशी संतप्त प्रतिक्रिया पिंपरी मतदारसंघात उमटत आहे.
सीमा सावळे यांच्याकडे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील सर्वाधिक वादग्रस्त व्यक्तिमत्त्व म्हणून पाहिले जाते. अधिकारी असो, पत्रकार असो की सामान्य नागरिक असो सर्वांना अश्लिल भाषेत शिवीगाळ करणे, धमक्या देणे, भ्रष्टाचारातून कमाविलेल्या पैशांचा माज दाखविणे यासाठीच त्या अधिक ओळखल्या जातात. त्या अनेक राजकीय पक्ष फिरून आल्या आहेत. आता त्या कोणत्या राजकीय पक्षात आहेत हेच त्यांना सांगता येणार नाही, अशी स्थिती आहे. आधी त्या शिवसेनेच्या नगरसेविका होत्या. शिवसेनेचे दिवंगत खासदार गजानन बाबर यांना २०१४ च्या निवडणुकीत पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर सीमा सावळे यांचे गुरू सारंग कामतेकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २० कोटी रुपये घेऊन बाबर यांचा पत्ता कापल्याचा आरोप केला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सीमा सावळे यांची शिवसेनेतून अक्षरशः हकालपट्टी केली होती. त्यानंतर सारंग कामतेकर यांनी मनसेत प्रवेश केला. त्यामुळे सीमा सावळे या सुद्धा मनसेसोबत असल्याचे सांगितले जात होते. दरम्यान, २०१४ मध्ये राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता आली. सीमा सावळे यांचे गुरू सारंग कामतेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सीमा सावळे आणि सारंग कामतेकर यांनी महापालिकेत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात भ्रष्टाचारांच्या आरोपांची राळ उठविली. २०१७ मध्ये झालेल्या पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपची सत्ता आली. भाजपने सत्तेत येताच पहिल्याच वर्षी सीमा सावळे यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद दिले. आधी भ्रष्टाचारावर पोटतिडकीने बोलणाऱ्या या जोडीची स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळल्यानंतर शहरातील सर्वात भ्रष्ट राजकारणी म्हणून स्वतंत्र ओळख तयार झाली. सीमा सावळे यांनी गुरू सारंग कामतेकर यांच्या साथीने शहरातील करदात्या नागरिकांचे पैसे यथेच्छ लुटले. या दोघांच्या भ्रष्टाचाराच्या अनेक सुरस कथा आजही महापालिकेत चर्चिल्या जातात. त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराबाबत थेट पंतप्रधान कार्यालयापर्यंत तक्रारी गेल्या. मात्र केंद्रापासून ते राज्यापर्यंत भाजपचीच सत्ता असल्याने त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची आजपर्यंत चौकशी होऊ शकलेली नाही. या दोघांचे पासपोर्ट जरी तपासले तरी त्यांनी किती भ्रष्टाचार केला आहे, पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करून या जोडीने करदात्यांना किती लुटले आहे हे समोर येईल.
सीमा सावळे आणि सारंग कामतेकर यांनी पिंपरी-चिंचवडमधील करदात्या नागरिकांचे २०० ते ३०० कोटी रुपये लुटले असल्याची चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात आहे. एवढी लूट केल्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी या दोघांनीही पिंपरी-चिंचवड शहरातून पळ काढत अमरावती जिल्हा गाठला होता. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून सीमा सावळे यांनी निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत सीमा सावळे यांनी तेथील मतदारांना अनेक प्रलोभने दाखविली. तेथील महिला मतदारांना देण्यासाठी थेट गुजरातमधून निकृष्ट दर्जाच्या लाखो साड्या सीमा सावळे यांनी आणल्या होत्या. महिला मतदारांना त्या वाटपही करण्यात आल्या. तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील करदात्या नागरिकांचे लुटून नेलेले कोट्यवधी रुपये दर्यापूर विधानसभा मतदारसंघात त्यांनी खर्च केला. पाण्यासारखा पैसा खर्च करूनही तेथील मतदारांनी निवडणुकीत सीमा सावळे यांचे अक्षरशः डिपॉझीट जप्त केले.
त्यानंतर सीमा सावळे या पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात सक्रिय झाल्या. सध्या शहरातील काही बिल्डर आणि ठेकेदारांच्या प्रतिनिधी म्हणून सीमा सावळे यांना राजकीय वर्तुळात ओळखले जात आहे. त्यांनी पिंपरी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघात अनेक झोपडपट्ट्या आहेत. त्यामुळे या झोपडपट्टीतील गोरगरीब मतदारांना पैसे वाटले, वस्तू वाटले की आपण आमदार होऊ, असे स्वप्न सीमा सावळे पाहत असल्याचे चित्र आहे. त्यासाठी त्यांनी या मतदारसंघातील गोरगरीबांपर्यंत पोहोचण्यासाठी स्वतःच्या स्वभावाप्रमाणे भ्रष्ट नितीचाच अवलंब केला आहे. त्यांनी गेल्या काही दिवसांपासून पिंपरी विधानसभा मतदारसंघातील विविध झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या गोरगरीब नागरिकांना साडी आणि शर्ट व पॅन्ट पीस वाटपाचा धडाका लावला आहे. मतदारसंघातील गोरगरीब मतदारांना निवडणूक जाहीर होण्याआधीपासूनच सीमा सावळे यांनी प्रलोभन दाखवायला सुरूवात केली आहे.
मात्र सीमा सावळे यांनी वाटलेल्या साड्याआणि शर्ट व पॅन्ट पीस निकृष्ट दर्जाचे असल्याचे आता हे गोरगरीब नागरीक बोलू लागले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे सीमा सावळे यांनी झोपडपट्ट्यांमधील गोरगरीब महिलांना वाटलेल्या साड्या या पाच वर्षापूर्वी दर्यापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आणलेल्या साड्या असल्याचे सांगितले जात आहे. या साड्या आणि शर्ट व पॅन्ट पीस हातात पडताच त्याच्या दर्जावरून गोरगरीब झोपडीधारक सीमा सावळे यांना अक्षरशः शिव्यांची लाखोली वाहत आहेत. गांधीनगर झोपडपट्टीत साड्या वाटपासाठी गेलेल्या सीमा सावळे यांना काही साड्यांच्या वाटपानंतर तेथील महिलांनी त्यांना हाकलून दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तसेच लांडेवाडी झोपडट्टीतील ज्येष्ठ महिलांनी सीमा सावळे यांना शिव्या देऊन परत इकडे येऊ नको, अशी तंबी दिल्याचे सांगितले जात आहे.
निवडणुकीआधीच गोरगरीब मतदारांना विकत घेण्याच्या सीमा सावळे यांच्या या प्रयत्नाबद्दल मतदारसंघात संताप व्यक्त होत आहे. त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेत २०० ते ३०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप विरोधक करीत आहेत. एवढा भ्रष्टाचार करूनही गोरगरीब महिलांना किमान चांगल्या दर्जाच्या साड्या वाटप करण्याची सुद्धा दानत त्यांच्यात नसल्याची चर्चा मतदारसंघात आहे. झोपडपट्टीत राहत असलो तरी आम्ही काय भिकारी आहोत काय?, असे भीक देऊन आमदार होण्याचे स्वप्न सीमा सावळे यांना पडत असेल, तर आता त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाकडून निवडणूक लढवावी झोपडपट्टीतील स्वाभिमानी मतदार त्यांचे डिपॉझीट जप्त करेल, अशी प्रतिक्रिया झोपडपट्टीतील मतदार व्यक्त करत आहेत. सीमा सावळे यांना कोणता राजकीय पक्ष उमेदवारी देतो याकडे या झोपडीधारकांचे लक्ष लागले आहे. सीमा सावळे यांच्या अशा भ्रष्ट कारभारामुळे विधानसभा निवडणुकीत जो राजकीय पक्ष त्यांना उमेदवारी देईल, त्या राजकीय पक्षाला केवळ पिंपरी विधानसभा मतदारसंघातच नाही, तर चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातही मोठी किंमत मोजावी लागेल, अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे.