बॅनर न्यूज
है तयार हम, भोसरी मतदारसंघात शिवसैनिक जिंकण्याच्या मूडमध्ये
रवि लांडगेंनी राजकीय वासे फिरविल्याने एक लाखाच्या फरकाने मैदान मारण्यासाठी ठाकरेंचे शिवसैनिक लागले कामाला

पिंपरी : भोसरी विधानसभा मतदारसंघात सर्वांचेच लक्ष वेधून घेतलेले माजी नगरसेवक रवि लांडगे हे पक्षात आल्यानंतर शिवसैनिक भोसरी जिंकण्याच्या फूल मूडमध्ये दिसत आहेत. रवि लांडगे यांच्यामुळे या मतदारसंघातील राजकीय वासे फिरले आहेत. त्यामुळे शिवसैनिकांचा उत्साह दुणावला आहे. भोसरी मतदारसंघात एक लाखांहून अधिक फरकाने जिंकण्याचे लक्ष्य घेऊन शिवसैनिक कामाला लागल्याचे सांगितले जात आहे. शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह पक्षाच्या अन्य वरिष्ठ नेत्यांनाही भोसरी मतदारसंघात “है तयार हम” असा थेट संदेश पोहोचवला आहे. या मतदारसंघात हमखास निवडून येण्याची खात्री असल्याने शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा भोसरी लढविण्याचे स्पष्ट संकेत शिवसैनिकांना दिले आहेत. त्यामुळे भोसरी मतदारसंघ तर जिंकूच, पुढे हाच जोश घेऊन महाविकास आघाडीत पिंपरी-चिंचवड महापालिका सुद्धा ताब्यात घेऊ, असा आत्मविश्वास शिवसैनिकांमध्ये आला आहे. त्यामुळे भोसरी मतदारसंघात यंदा मशाल निश्चित पेटणार असल्याचे राजकीय चित्र निर्माण झाले आहे.
भोसरी विधानसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षापासून महेश लांडगे हे आमदार आहेत. पहिल्यांदा ते अपक्ष निवडून आले. दुसऱ्यावेळी ते भाजपच्या चिन्हावर निवडून आले. दहा वर्षात आमदार म्हणून त्यांनी भोसरी मतदारसंघावर मजबूत राजकीय पकड घेतल्याची हवा निर्माण झाली होती. प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करून कायम प्रसिद्धीझोतात राहण्याची कला त्यांना अवगत झाली आहे. त्यामुळे भोसरी मतदारसंघात सबकुछ महेश लांडगे असेच चित्र तयार झाले होते. मात्र महेश लांडगे यांच्या राजकीय फुग्याला रवि लांडगे नावाची टाचणी लागल्यानंतर भोसरी मतदारसंघातील राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे. आमदार महेश लांडगे यांनी भोसरी मतदारसंघात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कारभाराच्या माध्यमातून दहा वर्षांत केलेल्या राजकीय तांडवाबाबत विरोधक चिडीचूप राहणेच पसंत करत होते. मात्र माजी नगरसेवक रवि लांडगे यांनी आमदार महेश लांडगे यांच्यासोबत एकाच पक्षात म्हणजे भाजपमध्ये राहून चुकीच्या कामांना उघडपणे विरोध केला. भोसरीतील महापालिकेच्या रुग्णालयाचे खासगीकरण असो की अर्बन स्ट्रीट डेव्हलपमेंट या गोंडस नावाखाली भोसरीतील व्यापाऱ्यांना व सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासाच्या विरोधात रवि लांडगे यांनी जनतेचा आवाज बनण्याचे काम केले.
मात्र सत्तेची धुंदी चढलेल्या भाजपला जनतेचा आवाज बनलेल्या रवि लांडगे यांच्यातील नेतृत्वगुण कधीच दिसले नाहीत. उलट दहशत, दादागिरी, भ्रष्टाचाराच्या जोरावर केवळ “इव्हेंटबाज आमदार” म्हणून नावारुपाला आलेल्यांची भाजपला भुरळ पडल्याचे चित्र होते. पक्षाच्या स्थापनेपासून काम करणाऱ्या दिवंगत अंकुश लांडगे यांचे पुतणे असलेल्या रवि लांडगे यांना वेळोवेळी डावलून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ्स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतल्याचे आता हळूहळू सिद्ध होऊ लागले आहे. दीड-दोन महिन्यांपूर्वी रवि लांडगे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश करून भोसरी विधानसभा मतदारसंघात मशाल पेटवली आहे. ही मशाल अवघ्या काही दिवसांतच अशा पद्धतीने पेटली आहे की भोसरी मतदारसंघात भाजपचा सुपडा साफ होईल, असे राजकीय चित्र निर्माण झाले आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघात आमदार महेश लांडगे यांचा पराभव कोण करू शकेल, तर फक्त आणि फक्त रवि लांडगेच, असे गल्लोगल्ली, कट्ट्याकट्ट्यावर तसेच शहराच्या कानाकोपऱ्यात आता सामान्य नागरिक बोलू लागले आहेत. इतकेच नाही तर विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी केलेल्या निवडणूकपूर्व सर्व्हेमध्ये सुद्धा रवि लांडगे यांचा स्पष्ट विजय दिसत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे रवि लांडगे यांच्याकडे भोसरी विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक प्रभावशाली नेते म्हणून पाहिले जाऊ लागले आहे.
अवघ्या एक-दोन महिन्यांत भोसरी मतदारसंघातील राजकीय चित्र पालटवणारे रवि लांडगे हे शिवसेना उद्धव ठाकरे गटात आल्याने शिवसैनिकांमध्ये सुद्धा प्रचंड राजकीय आशावाद निर्माण झाला आहे. रवि लांडगे यांनी गेल्या दीड-दोन महिन्यांपासून भोसरी मतदारसंघात प्रचाराचा धुरळा उडविला आहे. त्यांना मतदारसंघातील नागरिकांकडूनही प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. विशेषतः तरुणाईत रवि लांडगे यांच्यासारखी क्रेझ असणारा दुसरा नेता या शहरात नसल्याचे प्रचार दौऱ्यात स्पष्टपणे दिसत आहे. स्वभावाने फार कमी बोलणारे रवि लांडगे हे मतदारसंघात ज्या ज्या भागात जातात तेथे त्यांचा पडणारा वैयक्तिक प्रभाव पाहून शिवसैनिक सुद्धा अचंबित होत आहेत. आजपर्यंतच्या शहराच्या राजकारणात शिवसेनेला पहिल्यांदाच असा ताकदीचा नेता मिळाल्याने शिवसैनिकांमध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण झाल्याचे चित्र आहे.
कोणतीही निवडणूक आली की सत्ताधाऱ्यांची दहशत, दडपशाही आणि धमकीला सामोरे जावे लागणाऱ्या शिवसैनिकांना आता धमक्या देण्याची कोणी हिमत सुद्धा करू शकणार नाही, अशी स्थिती रवि लांडगे यांच्यामुळे निर्माण झाल्याचे भोसरी मतदारसंघातील राजकीय वास्तव आहे. एवढेच नाही तर भोसरी मतदारसंघातील भाजपचे सर्व जुने-जाणते पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा रवि लांडगे यांचेच काम करणार हे राजकीय गुपित शिवसैनिकांपासून लपून राहिलेले नाही. त्यामुळे भोसरी मतदारसंघात यंदा भाकरी फिरवायचीच या इराद्याने शिवसैनिक जोरदार कामाला लागल्याचे दिसत आहे. विधानसभा निवडणूक जसजसे जवळ येत आहे तसतसे भोसरी मतदारसंघात शिवसैनिक एक लाखांहून अधिक फरकाने निवडणूक जिंकण्याचे लक्ष्य घेऊन कामाला लागल्याचे सांगितले जात आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह पक्षाच्या अन्य वरिष्ठ नेत्यांनाही या शिवसैनिकांनी “है तयार हम” असा संदेश पोहोचवला आहे. राज्यातील नेत्यांना सुद्धा भोसरी मतदारसंघात यंदा मशाल पेटणार असल्याचे स्पष्ट दिसू लागले आहे. त्यामुळे शिवसैनिकांना भोसरीत लढण्याचे स्पष्ट संकेत नेत्यांनी दिले आहेत. रवि लांडगे यांच्या पक्षप्रवेशावेळी स्वतः उद्धव ठाकरे यांनी सुद्धा यंदा भोसरीत भगवा फडकविल्याशिवाय राहणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे जागा वाटपाची घोषणा कधी होते याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले असून, भोसरी मतदारसंघात यंदा रवि लांडगे परिवर्तन घडवतील, असे चित्र निर्माण झाले आहे.