बॅनर न्यूज

अजित पवार पिंपरी-चिंचवडमध्ये मोठा राजकीय डाव टाकणार; शरद पवार गटाच्या निष्ठावानांना सतरंज्याच उचलाव्या लागणार?

शरद पवार गटात नव्याने येणाऱ्या माजी नगरसेवकांच्या माध्यमातून महापालिका पुन्हा अजित पवारांच्याच ताब्यात राहणार?

Spread the love
पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पिंपरी-चिंचवडमधील अनेक माजी नगरसेवक अचानकपणे शरद पवार गटात जाण्यास उत्सुक दिसू लागल्याने शहरात तो चर्चेचा विषय झाला आहे. हे माजी नगरसेवक महाविकास आघाडीत जाण्याचा उघड इशारा देऊ लागले आहेत. परंतु, विधानसभा निवडणुकीचे निमित्त करून स्वतः अजित पवारच या माजी नगरसेवकांना शरद पवार गटात जाण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याची चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात आहे. पुढे याच नगरसेवकांच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड महापालिकेवर आपले वर्चस्व कायम ठेवण्याचा अजित पवार यांचा भविष्याचा राजकीय प्लॅन असल्याचे बोलले जात आहे. तसे झाले तर राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर शरद पवार गटासोबत राहण्याचा निर्णय घेतलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर पुन्हा सतरंजी उचलण्याचीच वेळ येण्याची राजकीय शक्यता दिसत आहे. अशा परिस्थितीत शरद पवार ही राजकीय स्थिती कशी हाताळतात?, पक्षात दोन गट पडल्यानंतर अजितदादांचा बालेकिल्ला असूनही पक्षासाठी खंबीरपणे उभे राहिलेल्या निष्ठावान सर्वसामान्य कार्यकर्त्यांना विधानसभा व आगामी महापालिका निवडणुकीत न्याय देतात का?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 
 
पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून अनेक नाट्यमय राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. शहरात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे बलाढ्य राजकीय पक्ष आहेत. हे दोन्ही पक्ष राज्याच्या सत्तेत महायुती म्हणून एकत्र आहेत. आता ते आगामी विधानसभा निवडणुकीत एकत्र लढणार आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. महायुतीमध्ये मतदारसंघात ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाला ती जागा सोडण्याचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. पिंपरी-चिंचवडमधील चिंचवड आणि भोसरी या दोन विधानसभा मतदारसंघात भाजप, तर पिंपरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा आमदार आहे. त्यामुळे चिंचवड आणि भोसरी हे दोन्ही मतदारसंघ भाजपला आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळणार हे ठरले आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकांनी गेल्या काही दिवसांपासून अचानक चिंचवड विधानसभा मतदारसंघावर दावा करण्यास सुरूवात केली आहे. माध्यमांसमोर येऊन हे माजी नगरसेवक अजित पवार यांनाच आव्हान देत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. चिंचवड मतदारसंघावर दावा करताना त्यांच्या पक्षाचा उमेदवार कोण हे मात्र या माजी नगरसेवकांना सांगताना जीभ जड जात आहे. 
 
चिंचवड मतदारसंघ मिळाला नाही, तर महाविकास आघाडीत प्रवेश करू, अशी उघड धमकी हे माजी नगरसेवक अजित पवार यांना देऊ लागले आहेत. अजित पवारांनी नुसते डोळे वटारले तरी गायब होणारे हे माजी नगरसेवक आता अचानक त्यांच्या विरोधी भूमिका कशी काय घेऊ लागले आहेत?, अजित पवार गटात अचानक घडू लागलेली ही राजकीय भानगड नेमकी काय आहे?, असे प्रश्न शहरातील सर्वसामान्यांना पडले आहेत. त्यातून स्वतः अजित पवार हेच या माजी नगरसेवकांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात जाण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याची चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात आहे. कारण दीड-दोन महिन्यात राज्यात सत्ताबदल होईल. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येईल, अशी राजकीय चिन्हे दिसत आहेत. तसे झाल्यास पिंपरी-चिंचवड महापालिकेतही भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सत्ता मिळणे कठीण होईल. अशा परिस्थितीत कधीकाळी आपल्यासोबत असलेले हेच माजी नगरसेवक पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सत्तेत केंद्रस्थानी राहावेत आणि त्यांच्या माध्यमातून पडद्याआडून महापालिकेच्या सत्तेतील फायदा पदरात पाडून घेता यावा, असा कुटील राजकीय डाव शिजत असल्याचे बोलले जात आहे.
 
पिंपरी-चिंचवड ही मोठी महापालिका आहे. तसेच पुणे आणि मुंबईला जोडणारी ही महापालिका असल्याने येथील जमिनींना सोन्याचा भाव आहे. राज्याच्या राजकीय वर्तुळात पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी म्हणून पाहिले जाते. ही कोंबडी सोडणे परवडणारे नाही याची राजकीय जाणीव अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकांना आणि खुद्द अजित पवार यांना देखील आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक निमित्त आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा खरा डोळा हा पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्तेवर असल्याचे राजकीय वास्तव आहे. याच राजकीय वास्तवतेतून भविष्याचा विचार करत अजित पवार गटाचे माजी नगरसेवक चिंचवड विधानसभा मतदारसंघ मिळावा याचे कारण पुढे करून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. हा राजकीय डाव अजित पवार यांचाच असल्याचेही बोलले जाते. हा कुटिल राजकीय डाव यशस्वी झाल्यास अडचणीच्या काळात शरद पवार गटासोबत राहिलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पुन्हा सतरंज्याच उचलाव्या लागतील, अशी राजकीय चिन्हे दिसू लागली आहेत.   
 
विधानसभा निवडणुका संपताच चार-पाच महिन्यात महापालिकांच्या निवडणुका होऊ शकतात. अजित पवार गटातून शरद पवार गटात येणारे माजी नगरसेवक महापालिका निवडणुकीत शंभर टक्के उमेदवारी मागणार आहेत. या माजी नगरसेवकांना पक्षाकडून प्राधान्य दिले जाणार हे निश्चित आहे. तसे झाल्यास महापालिकेत सत्ता आल्यानंतर पुन्हा अजित पवार गटाचेच माजी नगरसेवक शहराची सर्व सूत्रे आपल्या हातात घेणार हेही निश्चित आहे. त्यामुळे शरद पवार हे संकटात असताना त्यांना सोडून पिंपरी-चिंचवड शहर हा अजितदादांचा बालेकिल्ला आहे असे म्हणून त्यांच्यासोबत गेलेलेच पुन्हा महापालिकेतील सत्ताधारी असतील. याचाच अर्थ महापालिकेत सत्ताधारी म्हणून फक्त नावालाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष किंवा महाविकास आघाडी असेल, पण खरे सूत्रधार हे महायुतीत असूनही अजित पवार हेच राहणार असे शहराचे भविष्यातील राजकीय चित्र दिसू लागले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत येण्यासाठी माजी नगरसेवकांमध्ये जी चढाओढ दिसत आहे यामागचे खरे राजकीय सूत्रधार हे अजित पवार हेच असल्याची चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात आहे. अशा परिस्थितीत शरद पवार आगामी काळात काय भूमिका घेतात, संकटाच्या काळात खिंड लढवून थेट बलाढ्य समजले जाणारे अजित पवार आणि भाजपसोबत भिडणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना कितपत संधी देतात का?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button