पिंपरी चिंचवड
माजी नगरसेवक रवि लांडगे यांना गोरगरीबांच्या डोळ्यांची काळजी
भोसरी रुग्णालयातील नेत्ररोग विभागासाठी उपलब्ध करून दिल्या १० लाखांच्या मशीनरी

पिंपरी : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवानेते व माजी नगरसेवक रवि लांडगे यांच्या विशेष प्रयत्नातून स्मिथ ग्रुप आणि नाम फाऊंडेशनच्या वतीने नवीन भोसरी रुग्णालयातील नेत्ररोग विभागासाठी १० लाख रुपयांच्या अत्यावश्यक मशिनरी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे या रुग्णालयात डोळ्यांच्या उपचारासाठी येणाऱ्या गोरगरीब घरातील रुग्णांना दर्जेदार उपचार मिळणार आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भोसरी येथे नव्याने मोठे रुग्णालय उभारण्यात आले आहे. या रुग्णालयात सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार केले जातात. या रुग्णालयाचा भोसरी विधानसभा मतदारसंघासह आसपासच्या ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा फायदा होत आहे. या रुग्णालयाची उभारणी झाल्यानंतर आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून रुग्णालयाचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून झाला होता. रुग्णालयाचे खासगीकरण झाले असते, तर आज या रुग्णालयात येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना मोठी किंमत मोजल्यानंतरच उपचार मिळाले असते. त्याचप्रमाणे रुग्णालय चालविण्यास देण्यात आलेल्या ठेकेदाराला महापालिकेकडून पैसे दिले गेले असते. मात्र शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवानेते व माजी नगरसेवक रवि लांडगे यांनी जनआंदोलन करून भोसरी रुग्णालयाच्या खासगीकरणाचा डाव उधळून लावला होता.
आज हे रुग्णालय हजारो रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. या रुग्णालयात येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना चांगले उपचार होते की नाही यावरही माजी नगरसेवक रवि लांडगे यांची बारीक नजर असते. त्यामुळे शहरातील अन्य रुग्णालयांच्या तुलनेत भोसरी रुग्णालयाबाबत रुग्णांच्या तक्रारी नसतात हे वास्तव आहे. या रुग्णालयात विविध विभागासाठी रवि लांडगे हे सातत्याने विविध माध्यमातून मदत करीत असतात. प्रत्येक विभागात अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध असावी आणि गोरगरीब रुग्णांना खासगी रुग्णालयांप्रमाणेच दर्जेदार उपचार सुविधा मिळाव्यात असा त्यांचा प्रयत्न असतो. आता रवि लांडगे यांनी प्रयत्न करून स्मिथ ग्रुप आणि नाम फाऊंडेशच्या वतीने भोसरी रुग्णालयातील नेत्ररोग विभागासाठी १० लाखांच्या अत्यावश्यक मशिनरी उपलब्ध करून दिले आहेत. या मशीनरी भोसरी रुग्णालय प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत.
यावेळी स्मिथ ग्रुपचे वैभव परदेशी, वैशाली कुलकर्णी, दिव्या रामकृष्णन, नाम फाउंडेशनचे गणेश थोरात, शुभांगी नायक भोसरी रुग्णालयाचे प्रमुख ढगे, ऋतुजा लोखंडे, माजी नगरसेवक रवि लांडगे यांचे बंधू प्रकाश लांडगे आदी उपस्थित होते.