बॅनर न्यूज

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचे कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांची हकालपट्टी करा

शरद पवार संजीवनी आरोग्य मित्रचे राज्यप्रमुख डॉ. सतीश कांबळे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

Spread the love

पिंपरी : महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांवर वेळेत उपचार केले जात नाहीत. या योजनेसाठी पात्र असणाऱ्या रुग्णांकडून रुग्णालये औषधाचे पैसे तसेच इम्प्लांटच्या नावाखाली पैसे लाटत आहेत. एक प्रकारे सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांची राज्यभर हेळसांड होताना दिसत आहे. यासंदर्भात शासनाने या योजनेसाठी नेमलेले कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्याकडे तक्रारी करूनही ते निव्वळ झोपा काढताना दिसत आहेत. असंख्य तक्रारी प्राप्त असून देखील ते रुग्णालयांवर कोणतीच कारवाई करीत नाहीत. तेच विविध रुग्णालयांशी संगनमत करून पैसे लुटण्याचा धंदा करीत आहेत. त्यामुळे महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचे कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांची तातडीने हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी शरद पवार संजीवनी आरोग्य मित्रचे राज्यप्रमुख डॉ. सतीश कांबळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात डॉ. सतीश कांबळे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “सध्या राज्यातील सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांसाठी आरोग्य सेवा मिळणे खूप भयानक झालेले आहे. रुग्णालये जुन्या चित्रपटांमधील डाकू मंगलसिंगचे चोरीचे अड्डे झालेले आहेत. त्यांना भस्म्या आजार जडला आहे. ही रुग्णालये सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांची बिलासाठी लूट करताना दिसत आहेत. राज्य सरकारने सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातील रुग्णांना पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत देण्याची घोषणा केली आहे. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या अंतर्गत हे उपचार दिले जाणार आहेत. या योजनेसाठी राज्य सरकारने कार्यकारी अधिकारी पदाची निर्मिती करून रमेश चव्हाण यांची या पदावर नियुक्ती केली आहे.

गोरगरीब रुग्णांना चांगले उपचार देण्यासाठी सुरू केलेल्या या योजनेविषयी राज्यभरात विपरित परिस्थिती आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत. अपुरे मनुष्यबळ, डॉक्टरांची कमतरता, औषधांचा तुटवडा, असल्यामुळे गोरगरीब रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाहीत. त्यामुळे काही रुग्णांना आपला जीव सुद्धा गमवावा लागत आहे. बऱ्याच वेळा रुग्ण महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना लागू असलेल्या खाजगी रुग्णालयात गेल्यानंतर आधी पैसे भरा, मगच तुम्हाला भरती करून घेतले जाईल ? असे सांगण्यात येते. या योजनेसाठी रुग्ण पात्र ठरत असताना देखील त्याच्याकडून औषधाचे पैसे, इम्प्लांटच्या नावाखाली रुग्णालये पैसे लाटत आहेत.

त्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांची अक्षरशः लुबाडणूक सुरू असल्याचे चित्र आहे. यासंदर्भात महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचे कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्याकडे असंख्य तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र ते संबंधित रुग्णालयांवर कारवाई करून सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांना मदत करण्याऐवजी निव्वळ झोपा काढत आहेत. एवढेच नाही तर ते गोरगरीब रुग्णांना लुटणाऱ्या संबंधित रुग्णालयांशी संगनमत करून पैसे लुटण्याचे काम करीत आहेत. ही अतिशय गंभीर बाब असून राज्यभरातील गोरगरीब रुग्णांची आर्थिक पिळवणूक आणि शोषण करण्याच्या या प्रकाराची गांभीर्याने दखल घ्यावी. याप्रकरणी उच्चस्तरीय समिती स्थापन करून चौकशी करण्यात यावी. तसेच कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांची तातडीने हकालपट्टी करावी. ते या पदावर बसण्यास पात्र नसल्याने त्यांना बडतर्फ करण्यात यावे. तसेच सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांच्या तक्रारीची दखल घेऊ शकेल अशा अधिकाऱ्याची कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.”

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button