बॅनर न्यूज
भोसरी मतदारसंघात आव्वाज कुणाचा; पिंपरी-चिंचवडमध्ये १० वर्षानंतर शिवसेनेचा आमदार होणार?

पिंपरी : विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीचे जागा वाटप कधीही जाहीर होईल अशी स्थिती आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात पिंपरी-चिंचवडमधील तीन विधानसभा मतदारसंघांपैकी एक विधानसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मिळणार आहे. या तीनपैकी भोसरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला विजयाची शंभर टक्के खात्री आहे. त्यामुळे भोसरी मतदारसंघ शिवसेना लढविणार हे आता जवळपास निश्चित झाल्याचे सूत्रांनी सांगितले. पिंपरी-चिंचवड महापालिकेवर बिनविरोध निवडून येत शहराच्या राजकारणात इतिहास रचणारे रवि लांडगे उमेदवार म्हणजे भोसरी मतदारसंघात शंभर टक्के विजय असे राजकीय समीकरण बनले आहे. त्यामुळे रवि लांडगे हेच भोसरी मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे फिक्स उमेदवार असणार आहेत. रवि लांडगे यांच्या रुपाने पिंपरी-चिंचवडमध्ये १० वर्षानंतर शिवसेनेचा जनतेतून निवडून येणारा शिवसेनेचा आमदार हा भोसरी मतदारसंघातील असेल, असे अनुकूल राजकीय चित्र निर्माण झाले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी कधीही आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्याकडे सर्वच राजकीय पक्ष आणि कार्यकर्त्यांची नजर लागलेली आहे. तत्पूर्वी महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात जागा वाटपासाठी मुंबईत बैठकांवर बैठका सुरू आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. महायुतीत या तीनही मतदारसंघाचे वाटप निश्चित झाले आहे. भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ भाजप, तर पिंपरी मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट लढविणार आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीत सुद्धा शहरातील तीनही मतदारसंघांच्या वाटपाबाबत आतापर्यंत अनेक बैठका झालेल्या आहेत. त्यात तीन मतदारसंघापैकी दोन मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, तर एक मतदारसंघ शिवसेना उद्धव ठाकरे गट लढविणार असल्याचे जवळपास निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाला भोसरी विधानसभा मतदारसंघात विजयाची शंभर टक्के खात्री आहे. त्यामुळे महाविकास आघाडी भोसरी मतदारसंघ मशाल चिन्हावर लढणार हे फिक्स झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेवर बिनविरोध निवडून आलेले माजी नगरसेवक रवि लांडगे भोसरी मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा चेहरा बनले आहेत. मतदारसंघातील सर्वसामान्यांमध्ये असलेली चांगली प्रतिमा, सर्वांच्या मदतीला धावून जाण्याचा स्वभाव, प्रत्येक गोष्टींचा इव्हेंट व दिखाऊपणा किंवा भपकेबाजीपणा न करता प्रत्यक्ष लोकांमध्ये मिसळून काम करण्याची प्रवृत्ती, विरोधकांविषयी कपट भावना न ठेवता जनतेच्या कामांना प्राधान्य देण्याची वृत्ती यामुळे रवि लांडगे हे जनतेचा उमेदवार म्हणून पुढे आले आहेत. मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या तोंडी फक्त रवि लांडगे यांचेच नाव येत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच भोसरी मतदारसंघात रवि लांडगे यांचा विजय निश्चित असल्याचा आवाज मतदारसंघातील जनतेतून येत असल्याचे चित्र आहे. फक्त ते किती फरकाने निवडून येतात याचीच उत्सुकता मतदारसंघातील जनतेमध्ये दिसत आहे. रवि लांडगे उमेदवार म्हणजे विजय पक्का असे राजकीय समीकरण भोसरी मतदारसंघात तयार झाले आहे. रवि लांडगे यांच्यासमोर भाजपचे आमदार महेश लांडगे यांचा निभाव लागणार नाही असेच राजकीय चित्र आहे. त्यामुळे भोसरी मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार रवि लांडगे हे फिक्स असल्याचे सूत्रांनी सांगितले.
भोसरी मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा विजय निश्चित दिसू लागल्याने या विजयासोबतच पिंपरी-चिंचवडमध्ये एक राजकीय इतिहास रचला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रवि लांडगे यांचा भोसरी मतदारसंघात विजय झाला, तर १० वर्षांनंतर पिंपरी-चिंचवडमध्ये जनतेतून निवडून येणारा शिवसेनेचा आमदार म्हणून त्यांची शहराच्या राजकारणात नोंद होणार आहे. २००९ पूर्वी पिंपरी-चिंचवड शहरासाठी हवेली हा एकच विधानसभा मतदारसंघ होता. १९९५ आणि १९९९ या सलग दोन विधानसभा निवडणुकीत हवेली मतदारसंघात शिवसेनेचे गजानन बाबर विजयी झाले होते. त्यानंतर २०१४ मध्ये पिंपरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार आमदार झाले होते. गेल्या दोन निवडणुकीत शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत पिंपरी-चिंचडमध्ये कधीच विजय मिळवता आलेला नाही. परंतु लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने पिंपरी-चिंचवडमध्ये कायम वर्चस्व राखत विजय संपादन केला आहे. पूर्वीचा खेड लोकसभा मतदारसंघ असेल किंवा मतदारसंघ पुनर्रचनेनंतर तयार झालेले मावळ आणि शिरूर हे दोन लोकसभा मतदारसंघ असतील शिवसेनेचाच विजय झालेला आहे.
शिरूर मतदारसंघात २०१९ आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा अपवाद वगळता पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेने लोकसभा निवडणुकीत कधी पराभव पाहिलेला नाही. पिंपरी-चिंचवड शहरात शिवसेनेची एक पक्की आणि कट्टर व्होट बँक आहे. त्यामुळे कधीकाळी सलग दोनवेळा आमदार, आधीचा खेड आणि नंतरच्या शिरूर लोकसभा मतदारसंघात सातत्याने तीन वेळा आणि मावळ मतदारसंघात सुद्धा सातत्याने तीनवेळा विजय मिळालेल्या शिवसेनेला येत्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागा वाटपात पिंपरी-चिंचवडमध्ये एक मतदारसंघ द्यावाच लागेल असे चित्र आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ज्या राजकीय पक्षाची हमखास निवडून येण्याची क्षमता त्या पक्षाला ती जागा सोडण्याचे सूत्र ठरले आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवडमधील तीन मतदारसंघांपैकी भोसरी मतदारसंघात रवि लांडगे हे हमखास निवडून येतील असेच राजकीय वातावरण आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत भोसरी मतदारसंघ हा शिवसेना उद्धव ठाकरे गट लढविणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. आता जागा वाटपाची घोषणा कधी होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.