बॅनर न्यूज

भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी जाता जाता जनतेला गंडविले; महापालिका आयुक्त शेखर सिंह यांचाही सहभाग

भारताचे संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान; दोघांवरही गुन्हा दाखल करण्याची धम्मराज साळवे यांची राज्यपालांकडे मागणी

Spread the love
पिंपरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशात लोकशाही असावी यासाठी लिहिलेल्या संविधानाला भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार महेश लांडगे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी पायदळी तुडविले आहे. भोसरी मतदारसंघात महापालिकेच्या वतीने संविधान भवन उभारण्यासाठी अद्याप निविदा प्रक्रिया सुरू आहे. तरीही भाजप आमदार महेश लांडगे यांनी नियोजित संविधान भवनाचे मंगळवारी १४ ऑक्टोबर रोजी भूमीपूजन केले. त्यामुळे आमदार महेश लांडगे यांनी प्रशासनाला हाताशी धरून जाता जाता भोसरी मतदारसंघातील जनतेला संविधान भवनाच्या मुद्द्यावरून गंडविल्याची भावना व्यक्त होत आहे. दरम्यान, आमदार लांडगे आणि आयुक्त सिंह यांनी संविधानाचा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला असून दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे वरिष्ठ उपाध्यक्ष धम्मराज साळवे यांनी राज्यपालांकडे केली आहे.  
 
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पीएमआरडीएच्या पेठ क्रमांक ११ मध्ये संविधान भवन आणि विपश्यना केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने ११७ कोटी १८ लाख ९ हजार ९१९ रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे. ही निविदा भरण्यासाठी २५ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. याचाच अर्थ या कामांसाठी अद्याप निविद प्रक्रिया सुरू आहे. असे असताना आमदार महेश लांडगे यांनी सोमवारी १४ ऑक्टोबर रोजी संविधान भवन उभारण्यात येत असलेल्या नियोजित ठिकाणी जाऊन या भवनाच्या कामाचे भूमीपूजन केले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नाव वापरून हा भूमीपूजन कार्यक्रम करण्यात आला. तसेच या कार्यक्रमासाठी महापालिकेने शहरातील करदात्या नागरिकांनी घाम गाळून भरलेले लाखो रुपये खर्च केले. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या संमतीनेच हा कार्यक्रम करण्यात आला. वास्तविक ज्या कामाची निविदा अजून अंतिमच झालेली नाही त्या कामाचे भूमीपूजन करून भाजप आमदार महेश लांडगे व महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी संविधानालाच पायदळी तुडविण्याचे काम केले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशात लोकशाही असावी यासाठी संविधान लिहिले आहे. या संविधानामध्ये लोकसेवकांची सर्वात महत्त्वाची भूमिका असते. लोकसेवक हम करे सो कायदा या पद्धतीने वागू लागले म्हणजे लोकशाही जिवंत नसल्याचे आणि संविधान फेकून दिल्याचे लक्षण मानले जाते. भाजप आमदार महेश लांडगे आणि महापालिका आयुक्त शेखर सिंह हे दोघेही लोकसेवक आहेत. या दोघांनीही संविधानानुसार काम करणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र हे दोघेही लोकशाही आणि संविधान मानत नसल्याचे संविधान भवनाच्या भूमीपूजन कार्यक्रमावारून स्पष्ट झाले आहे. जे कामच अंतिम झालेले नाही, त्या कामाचे भूमीपूजन करून भाजप आमदार महेश लांडगे आणि महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान आम्ही मानत नसल्याचे सिद्ध केले आहे. या दोघांनीही संविधान मानण्यापेक्षा ती पायदळी तुडवून त्याचे भावनिक राजकारण करण्याचे काम केले आहे. त्याचप्रमाणे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दसरा सणादिवशी सुट्टी असतानाही अनेक कामांना संशयास्पदरीत्या मंजुरी दिल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे वरिष्ठ उपाध्यक्ष धम्मराज साळवे यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे तक्रार केली आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार महेश लांडगे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी निविदा अंतिम न झालेल्या संविधान भवनाच्या कामाचे भूमीपूजन करून संविधानाचा अपमान केला आहे. त्यामुळे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दसरा या सणाच्या दिवशी सुट्टी असूनही मंजूर केलेल्या सर्व प्रकरणांची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी धम्मराज साळवे यांनी केली आहे.
 
ज्या कामाची निविदा प्रक्रियाच पूर्ण झालेली नाही, त्या कामाचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी भूमीपूजन करणे म्हणजे संविधानालाच पायदळी तुडविण्यासारखे आहे. भाजपची ही कृती म्हणजे भारताच्या संविधानाचा आणि हे संविधान लिहिलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सुद्धा अपमान करणारी आहे. धक्कादायक बाब म्हणजे संविधानाचा अपमान करणाऱ्या या कृतीमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांचाही सहभाग आहे. भारतीय जनता पार्टी प्रशासनाला हाताशी धरून संविधान बदलणार असल्याचे वारंवार समोर आले आहे. भाजपकडून संविधानाला नेहमीच धोका असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. आता पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या या कारभारावरून हे स्पष्ट होते की भाजप आणि प्रशासन संविधानाला मानत नाही. आम्ही म्हणतो तसेच काम करणार ही त्यांची वृत्ती यानिमित्ताने जगासमोर आली आहे. 
महापालिका आयुक्त शेखर सिंह हे ठेकेदार आणि बिल्डरांसाठी काम करत असल्याची अनेक उदाहरणे आतापर्यंत समोर आली आहेत. त्यांनी सुट्टीच्या दिवशी सुद्धा ठेकेदार आणि बिल्डरांसाठी पायघड्या घातल्या आहेत. त्यांनी १२ ऑक्टोबर २०२४ या दिवशी दसरा सणाची सुट्टी असतानाही अनेक कामांना मंजुरी दिली आहे. चिंचवड येथील ऑटो क्लस्टरमध्ये बसून त्यांनी हा कारभार केला आहे. त्यामुळे १२ ऑक्टोबर २०२४ रोजीचे ऑटो क्लस्टरमधील सीसीटीव्ही फुटेज तातडीने ताब्यात घेऊन त्याची तपासणी करण्यात यावी. त्याचप्रमाणे यादिवशी आयुक्त शेखर सिंह यांनी मंजूर केलेल्या सर्व कामांची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी धम्मराज साळवे यांनी राज्यपालांकडे केली आहे.
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button