बॅनर न्यूज
भोसरी विधानसभा मतदारसंघात बॅनर वॉर; आमदार महेश लांडगे यांच्या १० वर्षांच्या कारभाराला केले लक्ष्य

पिंपरी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्या दहा वर्षांच्या कारभाराला लक्ष्य करणारे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरची केवळ भोसरी मतदारसंघातच नाही तर संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात जोरदार चर्चा रंगली आहे.
महेश लांडगे हे गेल्या दहा वर्षांपासून भोसरी विधानसभेचे आमदार आहेत. पहिल्यांदा ते अपक्ष निवडून आले होते. त्यावेळी त्यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. दुसऱ्या विधानसभा निवडणुकीत ते भाजपच्या तिकीटावर लढले आणि जिंकले. दोन्ही निवडणुकीवेळी आमदार महेश लांडगे यांनी मतदारसंघातील जनतेला अनेक आश्वासने दिली होती. तसेच त्यांनी मतदारसंघातील जनतेला “व्हिजन २०२०” चे स्वप्न सुद्धा दाखविले होते. या व्हिजनअंतर्गत २०२० पर्यंत मतदारसंघात कोणती विकासकामे करणार हे त्यांनी सांगितले होते. आता २०२५ उजाडण्यासाठी अवघे दोन महिने उरले आहेत. परंतु आमदार महेश लांडगे हे आजही मतदारसंघातील जनतेला व्हिजन २०२० चीच कामे सांगत त्याची जाहिरातबाजी करून पुन्हा तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करीत आहेत.
मात्र आमदार महेश लांडगे यांच्याविरोधात भोसरी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचे चित्र आहे. ते ज्या पक्षाचे आमदार आहेत, त्या पक्षाचे पदाधिकारी सुद्धा त्यांच्यासोबत नसल्याचे पाहायला मिळत आहे. आमदार महेश लांडगे यांना दोनवेळा निवडून आणण्यात ज्या ज्या प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांनी सिंहाचा वाटा उचलला होता, ते सुद्धा आज त्यांच्यासोबत नसल्याचे राजकीय वास्तव आहे. त्यामुळे आमदार महेश लांडगे यांची मतदारसंघात दिवसेंदिवस वाईट अवस्था होत चालली आहे. मतदारसंघातील ही वाईट परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी गेल्या दीड-दोन महिन्यांपासून जाहिरातबाजीला जास्त प्राधान्य दिले आहे. स्वच्छतागृह असो, विविध माध्यमे असो, चित्रपटगृहे असो की रिक्षा महेश लांडगे यांनी जाहिरातबाजी करण्यासाठी एकही जागा सोडली नसल्याचे मतदारसंघातील चित्र आहे.
त्यांच्या या जाहिरातबाजीला विरोधकांनी संपूर्ण मतदारसंघात बॅनर लावून उत्तर दिले आहे. मतदारसंघात विविध भागांमध्ये लावण्यात आलेल्या या बॅनरवर १० वर्ष पोकळ जाहिरातबाजीची, १० वर्ष प्रतिक्षा रेडझोन हटविण्याची, १० वर्ष प्रतिक्षा हक्काच्या पाण्याची, १० वर्ष समाविष्ट गावांच्या अधोगतीची, १० वर्ष इतरांच्या कामाचं श्रेय लाटण्याची असा उल्लेख करण्यात आला आहे. आमदार महेश लांडगे यांच्या १० वर्षांच्या कारभाराला डिवचणाऱ्या या बॅनरबाजीची चर्चा भोसरी मतदारसंघासह संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात होत आहे.
दरम्यान, भोसरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून माजी नगरसेवक रवि लांडगे यांचे नाव प्रथम प्राधान्याने घेतले जात आहे. निवडणुकीत रवि लांडगे हे आमदार महेश लांडगे यांचा पराभव करतील, असे राजकीय वातावरण तयार झाले आहे. त्यांना जनतेतून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या मतदारसंघात आतापर्यंत करण्यात आलेल्या निवडणूकपूर्व सर्व सर्व्हेमध्ये रवि लांडगे यांचा विजय होत असल्याचा अंदाज समोर आला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत रवि लांडगे विरूद्ध महेश लांडगे अशी लढत झाल्यास आजच्या घडीला रवि लांडगे यांचे पारडे जड दिसत असल्याचे सध्याचे राजकीय चित्र आहे.