बॅनर न्यूज
भोसरीकरांचं ठरलं! रवि लांडगे मंगळवारी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश करणार अन् आमदारकी लढणार

पिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील सर्वांचे लक्ष वेधलेले भोसरी विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार व माजी नगरसेवक रवि लांडगे यांनी अखेर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी (२० ऑगस्ट रोजी) मुंबईत मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रवि लांडगे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या पक्ष प्रवेशाची भोसरी विधानसभा मतदारसंघात जय्यत तयारी सुरू आहे. रवि लांडगे हे मंगळवारी सकाळी सुमारे ५०० गाड्यांसह मुंबईकडे रवाना होणार आहेत. या पक्ष प्रवेश सोहळ्याकडे संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराचे लक्ष लागलेले आहे.
२०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत रवि लांडगे हे भाजपचे बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांच्या बिनविरोध निवडीसोबतच पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपच्या सत्तेचा श्रीगणेशा झाला होता. रवि लांडगे व त्यांचे कुटुंबीय हे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भाजपचे सर्वात जुने निष्ठावान म्हणून ओळखले जातात. भाजपचे राजकीय काम करताना रवि लांडगे यांचे चुलते व भाजपचे माजी शहराध्यक्ष दिवंगत अंकुशराव लांडगे यांना आपला जीव गमवावा लागला. दिवंगत अंकुशराव लांडगे यांनी देशात व राज्यात भाजपची सत्ता नसताना पिंपरी-चिंचवड महापालिकेत दोन अंकी नगरसेवक निवडून आणण्याची राजकीय किमया करून दाखविली होती. मात्र महापालिकेत सत्तेत आल्यानंतर त्याच कुटुंबाला कायम अपमानीत करण्याचे काम भाजपकडून झाले हे वास्तव आहे.
भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि त्यांचे बंधू कार्तिक लांडगे यांच्या महापालिकेतील आणि पक्षातील हुकूमशाही कारभारामुळे पक्षाच्या निष्ठावान कुटुंबातील असलेले व बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक रवि लांडगे यांना महापालिकेतील पदांपासून पाच वर्षे वंचित ठेवण्यात आले. स्थायी समितीचे अध्यक्षपद देण्याचे वचन देऊन शेवटच्या क्षणी त्यांचा केसाने राजकीय गळा कापण्यात आला. आमदार महेश लांडगे यांचे जवळचे नातेवाईक असलेल्या नितीन लांडगे यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद देण्यात आले. हेच नितीन लांडगे पुढे स्थायी समिती अध्यक्ष असताना ठेकेदाराकडून लाच घेतानाच्या प्रकरणात सापडले. पक्षाचा स्थायी समितीचा अध्यक्षच लाच प्रकरणात अटक होऊन जेलमध्ये गेल्याने संपूर्ण राज्यात भाजपची “छी-थू” झाली होती. अशा या कारभाराला आणि कायम डावलण्याच्या वृत्तीला व हुकूमशाही कारभाराला विरोध करीत रवि लांडगे यांनी भाजपचा राजीनामा देत बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
भाजपमधून बाहेर पडल्यानंतर रवि लांडगे यांनी अन्य कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश न करता “वेट अँड वॉच”ची भूमिका घेतली. आता विधानसभा निवडणुकीचे वारे सुरू झाले आहेत. भोसरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचा रवि लांडगे यांनी आमदारकी लढवावी यासाठी दबाव वाढला आहे. त्यामुळे रवि लांडगे यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेत संपूर्ण भोसरी मतदारसंघ पिंजून काढला आहे. त्यांना नागरिकांकडून मिळणारा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मात्र ते कोणत्या राजकीय पक्षाकडून लढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर त्यांनी नागरिक आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतक शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी २० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता ते शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. मुंबईत मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.