स्वराज्य पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी चिखली येथील विजय जरे यांची निवड

पिंपरी : स्वराज्य पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्षपदी चिखली येथील विजय जरे यांची निवड करण्यात आली आहे. स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी विजय जरे यांना निवडीचे पत्र दिले आहे.
विजय जरे हे गेल्या अनेक वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहरात सामाजिक कार्यात कार्यरत आहेत. छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केल्यानंतर विजय जरे यांनी या पक्षात प्रवेश केला. पक्षाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून शहरातील नागरिकांशी निगडीत विविध विषयांचा व समस्यांचा ते प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेऊन छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी त्यांच्याकडे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदाची धुरा सोपविली आहे.
निवडीनंतर बोलताना विजय जरे म्हणाले, “छत्रपती संभाजीराजे भोसले आणि पक्ष संघटनेतील इतर सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर विश्वास दाखविला आहे. माझ्याकडे पक्षाच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या पदाच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवडमधील सर्वसामान्य नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रशासकीय पातळीवर सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत असलेल्या अनास्थेविरोधात स्वराज्य पक्षाच्या संघर्ष करीत राहिल. त्याचप्रमाणे शहरात पक्ष वाढीसाठी मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.”