बॅनर न्यूज
भोसरी विधानसभा मतदारसंघाबाबत उत्सुकता; शरद पवार गटाकडून अरूण बोऱ्हाडे यांच्या नावाची चर्चा

पिंपरी : एकीकडे पिंपरी-चिंचवडधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून शरद पवार गटात इनकमिंग सुरू असताना दुसरीकडे भोसरी विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुकांची संख्याही वाढू लागली आहे. कामगार नेते, साहित्यिक व माजी नगरसेवक अरूण बोऱ्हाडे हे शरद पवार यांचे विश्वासू शिलेदार म्हणून ओळखले जातात. त्यांना भोसरी मतदारसंघात शरद पवार गटाकडून विधानसभेच्या रिंगणात उतरविण्यात यावे, अशी मागणी पुढे येत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघातून शरद पवार यांनी शिक्षक असलेल्या भास्कर भगरे गुरूजींना उमेदवारी देऊन खासदार बनविले. त्याच पद्धतीने भोसरी विधानसभा मतदारसंघातून अरूण बोऱ्हाडे यांना शरद पवार यांनी उमेदवारी द्यावी, अशी मागणी होऊ लागली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील तीन विधानसभा मतदारसंघांपैकी भोसरी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक राजकीय हालचाली सुरू आहेत. या मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात महाविकास आघाडी कोणाला उमेदवारी देणार याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली आहे. महायुतीत हा मतदारसंघ भाजपलाच सुटणार हे निश्चित आहे. त्यामुळे महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला भोसरीत गळती लागली आहे. अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह काही माजी नगरसेवकांनी बुधवारी शरद पवार गटात प्रवेश केला. प्रवेश करणारे सर्वच नगरसेवक व पदाधिकारी हे फक्त भोसरी विधानसभा मतदारसंघातील आहेत, हे विशेष. आता महाविकास आघाडीत विधानसभा मतदारसंघांचे जागा वाटप होत असताना भोसरी मतदारसंघ कोणत्या पक्षाच्या वाट्याला जाणार हे महत्त्वाचे ठरणार आहे. पण हा मतदारसंघ शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट लढविणार असल्याची चर्चाही होत आहे. त्यामुळेच शरद पवार यांनी अजित पवार गटातून प्रवेश करणाऱ्या कोणालाच भोसरी मतदारसंघातील उमेदवारीबद्दल शब्द दिला नसल्याचे सांगितले जात आहे.
असे असले तरी शरद पवार गटात अजित पवार गटातून इनकमिंग सुरू झाले आहे. दुसरीकडे भोसरी मतदारसंघातून विधानसभा लढण्यासाठी शरद पवार गटाकडून इच्छुकांचीही संख्या वाढू लागली आहे. शरद पवार गटात प्रवेश करणारे अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे हे विधानसभा लढण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र त्यांना स्थानिक पातळीवरच दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे राजकीय वास्तव आहे. असे असताना आता शरद पवार गटाच्या इच्छुकांमध्ये एका उच्चशिक्षित आणि अभ्यासू नावाची भर पडलेली आहे. भोसरी विधानसभेसाठी माजी नगरसेवक अरूण बोऱ्हाडे यांना शरद पवार गटाने संधी द्यावी, अशी मागणी काही जणांकडून पुढे येऊ लागली आहे.
अरुण बोऱ्हाडे हे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी स्वीकृत नगरसेवक आहेत. त्यांनी एचए कंपनीच्या कामगारांचे सुमारे २५ वर्षे नेतृत्व केले आहे. बजाज ऑटो, फोर्स मोटर्स या कंपन्यांच्या कामगार लढ्यातही बोऱ्हाडे यांचा पुढाकार होता. अनेक कंपन्यांतील कामगारांशी आणि कामगार संघटनांशी बोऱ्हाडे यांचा चांगला संपर्क आहे. तसेच ते एक उत्तम साहित्यिक म्हणून देखील ओळखले जातात. राजकारणातील एक प्रामाणिक व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. याशिवाय त्यांचे शरद पवार यांच्यासोबत थेट संपर्क आहे. त्यामुळे अरूण बोऱ्हाडे यांना भोसरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देऊन दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची राजकीय पुनरावृत्ती पिंपरी-चिंचवड शहरातही शरद पवार यांनी घडवून आणावी, अशी मागणी पुढे येत आहे. त्यामुळे आता हा मतदारसंघ महाविकास आघाडीत शरद पवार गटाला मिळणार का?, जागा मिळाल्यास अरूण बोऱ्हाडे की अन्य कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.