रेडझोनच्या प्रश्नाचे साकडे घालण्यासाठी राष्ट्रपतींना भेटण्यासाठी वेळ द्या; सचिन काळभोर यांची मागणी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील रेडझोनची हद्द कमी करण्याच्या मागणीसाठी पुण्याच्या दौऱ्यावर येत असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटण्याची वेळ देण्यात यावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे चिटणीस सचिन काळभोर यांनी पुणे पोलिस आयुक्तांकडे केली आहे.
यासंदर्भात सचिन काळभोर यांनी पुणे पोलिस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “पिंपरी-चिंचवड शहरातील रेडझोनचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. पुणे जिल्हाधिकारी यांनी दोन हजार यार्डापर्यंत रेडझोनची हद्द घोषीत केल्याने निगडी, तळवडे, चिखली, मोशी, रावेत, दिघी, बोपखेलमधील नागरिक बाधित होत आहेत. रेडझोनमुळे बँक लोन होत नाही, खरेदी-विक्री व्यवहार होत नाहीत. तसेच नागरी सुविधा उपलब्ध होत नाहीत. रेडझोनची हद्द ५०० मीटर करण्यात यावे, अशी येथील नागरिकांची मागणी आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने तीन महिन्यांपूर्वी महसूल विभागाला चार कोटी रुपये मोजून रेडझोनची मोजणी केली आहे. मात्र ही मोजणी जागेवर न जाता केवळ ड्रोनमार्फत करण्यात आली आहे. अशा या मोजणीवर अनेकांनी आक्षेप घेतलेला आहे. रेडझोनची हद्द करण्यासंदर्भात आमदार, खासदारांपासून ते मुख्यमंत्री आणि संरक्षण मंत्र्यांपर्यंत निवेदने देऊनही हा प्रश्न सुटत नाही. त्यामुळे आता शेवटचा पर्याय म्हणून देशाच्या राष्ट्रपतींना या प्रश्नासाठी साकडे घालण्यात येणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ३ सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर येत आहे. त्यामुळे त्यांना भेटून रेडझोनचा प्रश्न सांगण्यासाठी आणि तो मार्गी लावावा ही विनंती करण्यासाठी त्यांना भेटण्याची वेळ मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.”