बांगर्डे गावातील निकृष्ट दर्जाची कामे, पिण्याच्या अशुद्ध पाणीपुरवठ्या विरोधात राष्ट्रीय समाज पक्षाचा एल्गार
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात ९ सप्टेंबरपासून आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा

माळशिरस : तालुक्यातील बांगर्डे गावात ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या कामांबाबत तसेच ग्रामस्थांना शुद्धीकरणाची कोणतीही प्रक्रिया न करता दिल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या विरोधात राष्ट्रीय समाज पक्षाने एल्गार पुकारला आहे. गावात निकृष्ट दर्जाची कामे करून भ्रष्टाचार करणारा ग्रामसेवक, सरपंच आणि ठेकेदारावर कारवाई करावी. तसेच ग्रामस्थांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी आरटो फिल्टर चालू करण्याची कार्यवाही न झाल्यास ९ सप्टेंबरपासून आमरण उपोषण आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाने दिला आहे.
यासंदर्भात राष्ट्रीय समाज पक्षाचे माळशिरस तालुका अध्यक्ष मारूती मेटकरी यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. बांगर्डे ग्रामपंचायतीने शासनाच्या निधीतून गावामध्ये अनेक विकासकामे केली आहेत. मात्र प्रत्येक विकासकामांचा दर्जा निकृष्ट आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. ग्रामसेवक, सरपंच आणि ठेकेदारांनी संगनमताने प्रत्येक कामात भ्रष्टाचार करून निकृष्ट दर्जाची कामे ग्रामस्थांच्या माथ्यावर मारली आहेत. या सर्वांनी करदात्या नागरिकांच्या पैशांवर डल्ला मारला आहे. निकृष्ट दर्जाची कामे झाल्याने ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे या प्रत्येक कामाचा दर्जा तपासण्यात यावा यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत समिती माळशिरसचे गटविकास अधिकारी तसेच ग्रामपंचायतीकडे देखील पुराव्यासह अनेकदा तक्रार करण्यात आली आहे. मात्र या तक्रारींना प्रत्येकवेळी केराची टोपली दाखविण्याचे काम अधिकाऱ्यांनी केले.
त्याचप्रमाणे बांगर्डे ग्रामस्थांना दुषित पाणीपुरवठा केला जात आहे. ग्रामस्थांना शुद्धीकरण न करताच पिण्याचे पाणी दिले जात आहे. पिण्याच्या पाण्यावर करण्यात येणारी आरओ फिल्टर यंत्रणा बंद आहे. याबाबत पंचायत समिती माळशिरसच्या गटविकास अधिकाऱ्याकडे तक्रार करण्यात आली होती. त्यावर बांगर्डे ग्रामपंचायत कार्यालयाने गावातील लोकांना सुरळित पाणीपुरवठा होत आहे आणि आरओ फिल्टर यंत्रणा व्यवस्थितरित्या सुरू असल्याचा खोटा खुलासा गटविकास अधिकारी यांच्याकडे केल्याचा आरोप राष्ट्रीय समाज पक्षाने केला आहे. या खोट्या खुलाशामुळे ग्रामसेवक आणि सरपंचाच्या कारभाराविरोधात बांगर्डे ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत. सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीमध्ये थेट कॅनॉलमधून पाणी सोडले जात आहे. हेच पाणी ग्रामस्थांना पिण्यासाठी दिले जात आहे. त्यामुळे बांगर्डेतील ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला असून, लहान मुले आजारी पडणे तसेच महिलांना पोटाच्या तक्रारी, साथीचे रोग यांसारख्या गंभीर घटना घडू शकतात. याविषयी ग्रामस्थांनी ग्रामविकास अधिकारी सचिन गोरे यांच्याकडे विचारणा केली असता “हे आमचे काम नाही. तुम्ही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोला व तुम्हाला कुठे जायचे तिथे जावा. तसचे शासकीय कामात तुम्ही अडथळा निर्माण करत आहात म्हणून मी नातेपुते पोलीस स्टेशनला तुमच्या विरुद्ध ३५३ ता गुन्हा दाखल करीन व तुम्हाला चार-सहा महिने आतमध्ये बसवीन. बघू माझं कोण काय करते”, अशी धमकी ग्रामस्थांना दिली आहे.
आता याप्रकरणी राष्ट्रीय समाज पक्षाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, बांगर्डे ग्रामस्थांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी आरओ फिल्टर यंत्रणा तातडीने कार्यान्वित करण्याची मागणी केली आहे. वरील दोन्ही मागण्यांवर तातडीने कार्यवाही न केल्यास ९ स्पटेंबरपासून आमरण उपोषण आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाने दिला आहे. या निवेदनावर राष्ट्रीय समाज पक्षाचे माळशिरस तालुका अध्यक्ष मारूती मेटकरी, सचिन वाघमोडे, आत्माराम दडस, शिवाजी टकले, नामदेव देवकाते, पांडुरंग दडस, पांडुरंग किसवे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.