पिंपरी मतदारसंघात “पिंपरी-चिंचवड टाइम्स”चे ऑनलाईन सर्वेक्षण; लोक म्हणतात आमदार अण्णा बनसोडेंना “याच” देऊ शकतात टक्कर

पिंपरी : पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांच्या विरोधात लढण्यासाठी माजी नगरसेविका सुलक्षणा धर-शिलवंत या सक्षम उमेदवार असल्याचे “पिंपरी-चिंचवड टाइम्स”ने केलेल्या एका ऑनलाईन सर्वेक्षणात समोर आले आहे. या ऑनलाईन सर्वेक्षणात ४ हजार ५०० नागरिकांनी सहभाग घेतला. त्यातील ६७ टक्के नागरिकांनी आमदार अण्णा बनसोडे यांच्यासमोर सुलक्षणा धर-शिलवंत यांचेच तगडे आव्हान असेल, असे मत नोंदविले आहे. सुलक्षणा धर-शिलवंत या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या इच्छुक उमेदवार आहेत. हा मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार गटाने लढविल्यास सुलक्षणा धर-शिलवंत याच उमेदवार असतील, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होण्यास आता अवघे दीड महिने उरले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. यंदाची निवडणूक भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती विरूद्ध काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी यांच्यातच रंगणार आहे. असे असले तरी मनसे, वंचित बहुजन आघाडी आणि ठरले तर मराठा आंदोलनाचे उमेदवार स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास यंदाची निवडणूक बहुरंगी होऊन प्रचंड गाजणार आहे. त्यात बंडखोरांचे पेव फुटल्यास यंदाची निवडणूक प्रत्येक मतदारसंघात अत्यंत घासून होऊ शकते. त्यामुळे आगामी निवडणुकीबाबत संपूर्ण महाराष्ट्रातच प्रचंड उत्सुकता लागलेली आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवडमध्येही विधानसभा निवडणुकीबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. या तीनही विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीत विद्यमान आमदार ज्या पक्षाचा, त्याच पक्षाच्या वाट्याला मतदारसंघ येणार हे जवळपास निश्चित आहे. मात्र या विद्यमान आमदारांना टक्कर देणारा सक्षम उमेदवार कोण असू शकेल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. त्यामध्ये अनेकांची नावे चर्चेत आहेत. मात्र “पिंपरी-चिंचवड टाइम्स”ने लोकांच्या मनातला सक्षम उमेदवार कोण याचा अंदाज घेण्यासाठी तीनही विधानसभा मतदारसंघात ऑनलाईन सर्वेक्षण सुरू केले आहे.
पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी (एससी) राखीव आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे हे विद्यमान आमदार आहेत. आगामी निवडणुकीत महायुतीकडून तेच पुन्हा उमेदवार असणार हे जवळपास निश्चित आहे. ते दोनवेळा या मतदारसंघातून विजयी झाले आहेत आणि एकदा त्यांचा पराभव झालेला आहे. आता ते हॅट्ट्रिक करण्याच्या तयारीत आहेत. मात्र त्यांची ही हॅट्ट्रिक रोखण्याची ताकद या मतदारसंघातील कोणामध्ये आहे याचा अंदाज घेण्यासाठी “पिंपरी-चिंचवड टाइम्स”ने ऑनलाईन सर्वेक्षण केले. या ऑनलाईन सर्वेक्षणात ४ हजार ५०० जणांनी सहभाग नोंदविला आहे. त्यातील ६७ टक्के नागरिकांनी विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांना निवडणुकीत टक्कर देण्यासाठी माजी नगरसेविका सुलक्षणा धर-शिलवंत या सक्षम उमेदवार असल्याचे मत नोंदविले आहे. ४ हजार ५०० पैकी ३ हजार १५ जणांनी सुलक्षणा धर-शिलवंत यांना पसंती दिली आहे.
त्याखालोखाल वंचित बहुजन आघाडीचे इच्छुक उमेदवार महेंद्र सरवदे यांना १५ टक्के नागरिकांनी सक्षम उमेदवार असल्याचे म्हटले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांना ७ टक्के लोकांनी सक्षम उमेदवार असल्याचे म्हटले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) नेत्या व माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे यांना ४ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. सुलक्षणा धर-शिलवंत, महेंद्र सरवदे, गौतम चाबुकस्वार आणि चंद्रकांता सोनकांबळे यांना पसंती दिल्यानंतर उरलेल्या ७ टक्क्यांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे दुसरे इच्छुक उमेदवार मनोज गरबडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इच्छुक के. के. कांबळे, महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे बाबा कांबळे, भाजपाच्या तेजस्विनी कदम यांना नागरिकांनी पसंती दिलेली आहे.
नागरिकांचा हा ऑनलाईन कल पाहता पिंपरी विधानसभा मतदारसंघात आमदार अण्णा बनसोडे यांच्यासमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या इच्छुक उमेदवार सुलक्षणा धर-शिलवंत यांचेच तगडे आव्हान असणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शरद पवार गटाला सुटला, तर राष्ट्रवादीच्या दोन गटातच लढत निश्चित आहे. त्याचप्रमाणे या मतदारसंघातून लढण्यासाठी अनेक माजी नगरसेवक आणि अनेक हौसे, नवसे आणि गवसे देखील इच्छुक आहेत. त्यातील काहीजण बिल्डर आणि ठेकेदारांना हाताशी धरून राजकारणाचा धंदा करणारे, अन्य मतदारसंघात डिपॉझीट जप्त झालेले, वेळ आली तर शहर सोडून पळून जाणारे सुद्धा आहेत. या मतदारसंघातील इच्छुकांची यादी खूप मोठी आहे. त्यामुळे या मतदारसंघात हे सर्वचजण लढण्यासाठी उतरल्यास बहुरंगी लढत होणार आहे. या बहुरंगी लढतीत कोण कोणाची मते खाणार आणि त्याचा फायदा कोणाला होणार यावरच पिंपरी मतदारसंघातील विजयाचे गणित निश्चित होणार आहे.