बॅनर न्यूज
चिंचवड भाजपची “सेफ सीट”; मतदारसंघात “शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो”चा जप
पिंपरी-चिंचवडमध्ये राजकारणाला मर्यादा आहे, पण "जगताप पॅटर्न"ला नाही; विरोधकांमध्ये पडलेल्या उमेदवारांचा भरणा

पिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात “गेमचेंजर” म्हणून ओळखला जाणारा आणि “जगताप पॅटर्न”मुळे राज्याच्या राजकारणात चर्चेत असलेला चिंचवड मतदारसंघ हा भाजपच्या विजयाची शंभर टक्के खात्री देणारा मतदारसंघ बनला आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत चिंचवड मतदारसंघात महाविकास आघाडीची कसोटी लागणार हे निश्चित आहे. भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला चिंचवड मतदारसंघात पाऊण लाखांचे लीड देऊन भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला आहे. उत्साह संचारलेल्या भाजपकडून या मतदारसंघात “शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो” हाच जप सुरू आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीत इच्छुकांची रांग लागलेली आहे. रांगेतील बहुतांश जण एकदा, दोनदा, तीन-तीनदा पडलेले उमेदवार आहेत. त्यातील कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते याकडे सर्वांचे लक्ष आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील चिंचवड विधानसभा मतदारसंघ हा राज्याच्या राजकारणात कायम चर्चेत राहिलेला मतदारसंघ आहे. राजकीयदृष्ट्या आणि विकासाच्या दृष्टीनेही या मतदारसंघाची कायम चर्चा होत राहिली आहे. २००९ मध्ये हा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी सलग तीनवेळा या मतदारसंघात विरोधकांना धूळ चारली आहे. एकदा अपक्ष आणि दोनवेळा भाजपचे आमदार म्हणून ते निवडून आले होते. त्यांच्या मजबूत नेतृत्वामुळे चिंचवड मतदारसंघ हा पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात कायम “गेमचेंजर” मतदारसंघ राहिला आहे. दिवंगत लक्ष्मणभाऊ जगताप ज्या पक्षाच्या बाजूने त्या पक्षाची या शहरावर सत्ता असे राजकीय समीकरणच तयार झाले होते. २००९ मध्ये अपक्ष निवडून येऊन दिवंगत लक्ष्मणभाऊ जगताप यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला. त्यामुळे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणावर राष्ट्रवादीचे वर्चस्व निर्माण झाले.
त्यानंतर दिवंगत लक्ष्मणभाऊ जगताप यांनी २०१४ मध्ये भाजपात प्रवेश करून चिंचवड मतदारसंघाच्या रुपाने पिंपरी-चिंचवडमध्ये पहिल्यांदाच कमळ फुलविले. त्यांनी २०१७ मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची प्रथमच बहुमताने सत्ता आणली. २०१९ मध्ये ते पुन्हा भाजपकडूनच लढले आणि तिसऱ्यांदा आमदार झाले. शहरात आजही भाजपची ताकद आहे तशीच आहे. त्यामुळेच “चिंचवड मतदारसंघ” आणि “जगताप पॅटर्न” हे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील गेमचेंजर म्हणून ओळखले जातात. लक्ष्मणभाऊ जगताप यांचे जानेवारी २०२३ मध्ये अकाली निधन झाले. त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी आमदार म्हणून निवडून आल्या. आता आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपकडून चिंचवड मतदारसंघात दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे लहान बंधू आणि पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांना मैदानात उतरविण्याची जवळपास तयारी पूर्ण झाल्याचे चित्र दिसत आहे.
भाजपने शंकर जगताप यांच्यावर दाखवलेला विश्वास त्यांनी खरा केल्याचे पाहायला मिळत आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांनी निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी घेत भाजपला विजय मिळवून दिला. पुढे पक्षाने त्यांच्यावर शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली. या पदालाही त्यांनी पूर्ण न्याय दिल्याचे पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीची वाताहत होत असताना शंकर जगताप यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराला चिंचवड विधानसभा मतदारसंघात पाऊण लाखांचे मताधिक्य आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघातून १७ हजारांचे मताधिक्य मिळवून दिले आहे. याच मताधिक्यामुळे मावळमध्ये महायुतीचा विजय सोपा झाला. त्यामुळे शंकर जगताप यांनी लोकसभा निवडणुकीत आपले नेतृत्व सिद्ध केल्याचे मानले जात आहे. त्यातून त्यांनी विधानसभा निवडणुकीचा इरादा स्पष्ट केला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये राजकारणाला मर्यादा आहे, पण “जगताप पॅटर्न”ला मर्यादा नसल्याचे शंकर जगताप यांनी लोकसभा निवडणुकीत दाखवून दिले आहे.
येत्या विधानसभा निवडणुकीत चिंचवड मतदारसंघात शंकर जगताप हेच भाजपचे उमेदवार असतील याबाबत पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये कोणतेही दुमत नसल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत मावळमध्ये विजय मिळवत शंकर जगताप यांनी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये एक जोश निर्माण केला आहे. त्यामुळे भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीची आतुरतेने वाट पाहत असल्याचे चित्र आहे. चिंचवड मतदारसंघात आतापासूनच सगळीकडे “शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो” हाच जप सुरू असल्याचे राजकीय चित्र आहे. दुसरीकडे चिंचवड मतदारसंघात भाजपच्या विरोधात लढण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. इच्छुकांची ही रांग भली मोठी आहे. या रांगेत विधानसभा असो की महापालिका निवडणूक असो पडलेल्या उमेदवारांची संख्या अधिक दिसत आहे. महायुतीत भाजपसोबत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटातील माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नाना काटे, माजी नगरसेविका माया बारणे यांनीही विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटणार नाही हे सर्वांनाच माहिती असल्याने जागा वाटपानंतर हे तिघेही काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
भाऊसाहेब भोईर हे विधानसभा निवडणुकीत एकदा आणि महापालिका निवडणुकीत एकदा पराभूत झालेले आहेत. नाना काटे हे विधानसभा निवडणुकीत दोनदा पराभूत झालेले आहेत. याशिवाय विधानसभा निवडणुकीत तीनवेळा पडलेले आणि एकदा डिपॉझीट जप्ते झालेले राहुल कलाटे हे देखील चौथ्यांदा विधानसभा लढण्याच्या तयारीत आहेत. राहुल कलाटे हे सध्या कोणत्या राजकीय पक्षात आहेत हे कोणीच सांगू शकणार नाही अशी परिस्थिती आहे. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आणि २०२३ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने राहुल कलाटे यांना पाठिंबा दिला होता. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल कलाटे यांनी वंचित बहुजन आघाडीला फाट्यावर मारल्याचे दिसले. त्यामुळे राहुल कलाटे हे विधानसभा निवडणूक कोणत्या राजकीय पक्षाकडून लढणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याशिवाय राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे आणि रावेतचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे व चिंचवडचे माजी नगरसेवक संदिप चिंचवडे हे देखील विधानसभा लढण्याची तयारी करीत आहेत. यांपैकी कोणता उमेदवार शंकर जगताप यांच्या विरोधात निवडणूक मैदानात असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.