बॅनर न्यूज

सुवर्णप्रभाग ते उद्ध्वस्त प्रभाग; प्रभाग १५, आकुर्डी गावठाण -गंगानगर-निगडी वाहतूक नगरी प्राधिकरण

उपमहापौर, स्थायी समिती सदस्य राहिलेल्या नगरसेवकांच्या अपयशाची जिवंत साक्ष

Spread the love

पिंपरी : कधीकाळी प्राधिकरणातील सुवर्णप्रभाग म्हणून ओळखला जाणारा प्रभाग १५, आकुर्डी गावठाण – गंगानगर – निगडी वाहतूक नगरी हा परिसर आज अक्षरशः उद्ध्वस्त अवस्थेत पोहोचला आहे. नियोजनबद्ध विकास, स्वच्छ रस्ते, उत्तम नागरी सुविधा यासाठी नावाजलेला प्रभाग आज खड्ड्यांचे साम्राज्य, पाणीटंचाई, अस्वच्छता आणि प्रशासनाच्या बेफिकिरीचा नमुना बनला आहे. तसेच वाहतुकनगरी ही सत्ताधारी नगरसेवकांसाठी माथाडी कामागारांच्या नावाखाली खंडणी उकळणारी नगरी झाली आहे. याला सर्वस्वी माजी नगरसेवक कारणीभूत असून, सर्वात सुशिक्षित मतदार मानल्या जाणाऱ्या या प्रभागातील मतदारांना त्याच त्याच नगरसेवकांना पुन्हा पुन्हा निवडून न देता आता परिवर्तनाचा विचार करण्याची वेळ आली आहे. 

प्रभाग १५, आकुर्डी गावठाण – गंगानगर – निगडी वाहतूक नगरी प्राधिकरणातील बहुतांश रस्त्यांची अक्षरशः वाट लागली आहे. रस्त्यांची कामे अर्धवट, गटारी तुंबलेल्या, पथदिवे बंद, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर ही प्रत्येक समस्या नगरसेवकांच्या निष्काळजीपणाच्या कारभारावर बोट दाखवते. २०१७ नंतर आकुर्डी गावठाण आणि प्राधिकरणाच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी येऊनही तो कुठे गेला, याचे उत्तर आज नागरिकांना मिळत नाही. मात्र दुसरीकडे पाच वर्षात नगरसेवकांची संपत्ती, महागड्या गाड्यांमध्ये भर पडल्याचे दिसत आहे. म्हणजेच विकासासाठी आलेला निधी कोठे गेला याचे उत्तर यामध्येच सापडते. 

आकुर्डी गावठाण-प्राधिकरणातील नागरिकांचे तक्रारींचे ढीग साचले आहेत. पण नगरसेवकांना मात्र फोटोसेशन, श्रेय लाटणे आणि पोकळ आश्वासने यातच रस असल्याचे दिसते. विकासाऐवजी स्वतःचा आणि ठेकेदारांचा फायदा पाहणाऱ्या या कारभारामुळे सुवर्णप्रभाग असलेल्या या प्रभागाचा श्वास अक्षरशः गुदमरला आहे.

“हा आमचा प्रभाग आहे का?” असा सवाल आज येथील सुशिक्षित नागरिक संतप्त होऊन विचारत आहेत. प्रभागातील विकासाचा सुवर्णकाळ आठवणीत राहिला असून, आजची अवस्था पाहता नगरसेवकांचे अपयश उघड्या डोळ्यांनी दिसत आहे. या प्रभागातून २०१७ मध्ये निवडून आलेल्या चार नगरसेवकांपैकी एका नगरसेविकेला उपमहापौर, दोन नगरसेवकांना स्थायी समितीचे सदस्यपद मिळूनही सुवर्णप्रभाग असलेल्या आकुर्डी गावठाण-निगडी प्राधिकरणाची अक्षरशः वाट लागली आहे. या प्रभागात झालेल्या प्रत्येक कामात रिंग झाल्याचे उघड गुपित असून,त्यामुळेच प्रभागातील विकासाचा दर्जा संपल्यात जमा आहे. आता जर वेळेत बदल झाला नाही, तर हा प्रभाग पूर्णपणे रसातळाला जाण्यास फारसा वेळ लागणार नाही, अशी भीती व्यक्त होत आहे. आता नागरिक जागे होणार का, की पुन्हा एकदा अपयशालाच संधी देणार, हा खरा प्रश्न आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button