
पिंपरी : मोबाईलचा हेडफोन दिला नाही म्हणून तीन अल्पवयीन मुलासह चौघांनी एका अल्पवयीन मुलाच्या डोक्यात कोयत्याने वार केले. पिंपरीतील विठ्ठलनगर बिल्डिंगच्या गेटसमोर रविवारी ही घटना घडली.
याप्रकरणी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार श्रीकांत बाबासाहेब जावळे (वय १९, रा. विठ्ठलनगर) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यासह तीन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलासोबत त्यांच्या बहिणीचा १५ वर्षे वयाचा मुलगा बकरी ईद सणासाठी घरी येत होते. त्यावेळी आरोपीने फिर्यादीच्या बहिणीच्या मुलाकडे असलेला मोबाईलचा हेडफोन मागितला. त्यास त्याने नकार दिला म्हणून आरोपींनी त्याला शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या बहिणीचा मुलगा भांडणे सोडविण्यासाठी गेला असता आरोपीने त्याच्यावर लोखंडी कोयत्याने वार करून जखमी केले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.