आयात विरूद्ध निष्ठावंत; पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये वाढला संघर्ष
मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षामध्ये उमेदवारीसाठी मोठी चुरस पाहायला मिळत आहे. भाजपमध्ये ‘निष्ठावंत विरुद्ध आयात’ असा नवा संघर्ष उभा ठाकला आहे. नुकत्याच झालेल्या मुलाखतींमध्ये ८०२ इच्छुकांनी शड्डू ठोकला आहे. शनिवारी इतर पक्षातील अनेक माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, तर अजून काही रांगेत आहेत. यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.
काही दिवसांपासून चर्चा सुरू असलेल्या इतर पक्षांतील बड्या नेत्यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माजी महापौर संजोग वाघेरे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, राजू मिसाळ, स्थायी समितीच्या माजी सभापती उषा वाघेरे, नवनाथ जगताप, प्रशांत शितोळे, माजी नगरसेवक समीर मासुळकर, रवी लांडगे, जालिंदर शिंदे, अमित गावडे, संजय काटे, प्रसाद शेट्टी, विनोद नढे, मीनल यादव, माजी महापौर मंगला कदम यांचा मुलगा कुशाग्र कदम यांच्या आगमनामुळे पिंपरी-चिंचवड भाजपला ताकद मिळाली असली तरी मूळ कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. भाजपामध्ये अजून काही जणांचा प्रवेश होणार आहे. मात्र तिकीट वाटपावरून होणारी नाराजी पाहता हे प्रवेश तूर्तास थांबवण्यात आलेले आहेत. तिकीट कन्फर्म अटीवरच हे प्रवेश होणार आहेत. त्यामुळे पक्षाच्या निष्ठावंतांना सांभाळणे पक्षाला कठीण जात आहे.
घराणेशाही आणि बंडाळीचे सावट
यावेळच्या निवडणुकीत आजी-माजी आमदार आणि नगरसेवकांच्या नातेवाइकांनीही उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी केली आहे. ‘घराणेशाहीला थारा देणार नाही’ असा दावा करणाऱ्या पक्षांकडून नेत्यांच्या मुलांना किंवा पत्नीला तिकीट मिळते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर घराणेशाहीला प्राधान्य मिळाले, तर अनेक निष्ठावंत कार्यकर्ते बंडखोरीच्या किंवा पक्षांतराच्या पवित्र्यात आहेत. आता पक्ष आपली उमेदवारी यादी जाहीर करताना निष्ठावंतांना न्याय देतात की केवळ ‘निवडून येण्याची क्षमता’ पाहून आयातांना झुकते माप देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
निष्ठावंतांनाच प्राधान्य मिळण्याविषयी दबाव
महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच राजकीय वातावरण तापू लागले आहे. भारतीय जनता पक्षामध्ये उमेदवारीसाठी मोठी चुरस वाढली आहे. वर्षानुवर्षे पक्षाचा झेंडा खांद्यावर घेणाऱ्यांना डावलून बाहेरून आलेल्यांना संधी देऊ नये, अशी मागणी जोर धरू लागली आहे. ज्या जागांवर भाजपचा विजय निश्चित मानला जातो, तिथे निष्ठावंतांनाच प्राधान्य मिळावे, असा दबाव नेत्यांवर येत आहे.
आश्वासनांचा पाऊस मात्र समस्यांचा डोंगर कायम
राजकीय साठमारी सुरू असतानाच सर्वसामान्य पिंपरी-चिंचवडकर मात्र आजही मूलभूत समस्यांच्या विळख्यात अडकलेले आहेत. शहरातील खड्डेमय रस्त्यांमुळे जनता त्रस्त आहे. ड्रेनेजची अर्धवट कामे आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून ‘जैसे थे’ आहे. महापालिकेतील भ्रष्टाचाराने तर हिमनगाचे टोक गाठलेले आहे. निवडणूक जाहीर झाली की आश्वासनांची खैरात होते. मात्र निकालानंतर हे प्रश्न पुन्हा बासनात गुंडाळले जातात, अशी भावना नागरिकांमध्ये आहे.



