बॅनर न्यूज

पिंपरी-चिंचवडच्या राजकारणाचा केंद्रबिंदू रवि लांडगे आणि सुलक्षणा धर-शिलवंत

दोघांच्याही विरोधात सर्वपक्षीय राजकारण्यांकडून आर्थिक डावपेच सुरू

Spread the love
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पडद्यामागच्या राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. या पडद्यामागच्या घडामोडींमध्ये भोसरी विधानसभा मतदारसंघातील माजी नगरसेवक रवि लांडगे आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघातील माजी नगरसेविका सुलक्षणा धर-शिलवंत हे दोघे शहराच्या राजकारणात केंद्रबिंदू ठरले आहेत. या दोघांकडे विधानसभेच्या मैदानातील “डार्क हॉर्स” म्हणून पाहिले जात आहे. त्यांना जनतेतूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे शहरातील भल्याभल्या राजकारण्यांना अक्षरशः घाम फुटल्याचे चित्र आहे. सर्वपक्षीय राजकारण्यांनी एकत्र येत या दोघांचाही राजकीय काटा काढण्यासाठी आर्थिक डावपेच सुरू केल्याची चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात आहे. या डावपेचांना हे दोघेही जनतेच्या पाठबळावर पुरून उरतात की सर्वपक्षीय राजकारण्यांचे आर्थिक डावपेच यशस्वी ठरतात हे येत्या १५ दिवसांत स्पष्ट होणार आहे.
विधानसभा निवडणुकीची घोषणा कधीही होईल, अशी सध्या महाराष्ट्रातील स्थिती आहे. निवडणुकीसाठी प्रशासकीय पातळीवर सर्व तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष आणि इच्छुक जोमाने कामाला लागल्याचे पाहायला मिळत आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील कोणता विधानसभा मतदारसंघ कोणत्या राजकीय पक्षाला मिळणार याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली आहे. तरीही ढोबळ मानाने भोसरी विधानसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि चिंचवड व पिंपरी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. मतदारसंघ वाटपाच्या दरम्यान शहराच्या राजकारणात पडद्यामागच्या घडामोडींना वेग आलेला आहे. कोणता मतदारसंघ कोणाला मिळेल याचा अंदाज आल्याने अनेक धनदांडग्या इच्छुकांचे धाबे दणाणल्याचे चित्र आहे. तसेच काही विद्यमान आमदारांना महाविकास आघाडीत समोर कोण उमेदवार येणार याचाही अंदाज आल्याने समोरच्या संबंधित उमेदवाराचा पत्ता कट करण्यासाठी विरोधी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटून त्यांना “खोके” देण्याचाही प्रयत्न होत असल्याचे बोलले जात आहे. पडद्यामागच्या या सर्व राजकीय घडामोडींमध्ये भोसरी विधानसभा मतदारसंघातील माजी नगरसेवक रवि लांडगे आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघातील माजी नगरसेविका सुलक्षणा धर-शिलवंत हे दोघे शहराच्या राजकारणातील केंद्रबिंदू ठरले आहेत.
भोसरी विधानसभा मतदारसंघात रवि लांडगे यांनी विधानसभेचे मैदान मारण्यासाठी संपूर्ण तयारी केलेली आहे. त्यांना या मतदारसंघातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. त्यांनी प्रचाराला देखील सुरूवात केली असून, लोकांचा त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रवि लांडगे हे भाजपचे माजी नगरसेवक आहेत. भोसरीचे भाजपचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्या हुकूमशाही कारभाराला कंटाळून रवि लांडगे यांनी दोन-अडीच वर्षापूर्वीच भाजपला रामराम केला होता. आता त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे. रवि लांडगे यांच्या रुपाने भोसरी मतदारसंघात पहिल्यांदाच एक उच्चशिक्षित युवा चेहरा निवडणुकीच्या मैदानात दिसणार आहे. त्यांची स्वतःची राजकीय ताकद, शिवसेनेचे साथ आणि नागरिकांचा मिळणार प्रतिसाद यामुळे आमदार महेश लांडगे यांचा पराभव फक्त रवि लांडगे हेच करू शकतात, अशी भावना मतदारसंघातील लोकांमध्ये निर्माण झाल्याचे चित्र आहे.
दुसरीकडे पिंपरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या इच्छुक उमेदवारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका सुलक्षणा धर-शिलवंत यांचे नाव आघाडीवर घेतले जात आहे. किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यासुद्धा उच्चशिक्षित असून, पिंपरी मतदारसंघात जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. त्यांना सुद्धा नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून दोन गट निर्माण झाल्यानंतर सुलक्षणा धर-शिलवंत यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. तसेच त्यांना २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी सुद्धा देण्यात आली होती. नंतर ती बदलून आमदार अण्णा बनसोडे यांना देण्यात आली. त्यामुळे यंदा सुलक्षणा धर-शिलवंत यांनाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची उमेदवारी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
रवि लांडगे हे भोसरी मतदारसंघात आणि सुलक्षणा धर-शिलवंत हे पिंपरी मतदारसंघात निवडणुकीतील डार्क हॉर्स म्हणून पुढे आल्याने शहराच्या राजकारणातील भल्याभल्या राजकारण्यांची गोची झाली आहे. हे दोघे आमदार झाले तर आपले पुढे काय होणार या भितीने या सर्वपक्षीय राजकारण्यांना अक्षरशः घाम फुटला असल्याचे सांगितले जात आहे. त्यातून सर्वपक्षीय राजकारणी एकत्र आले असून, जर मतदारसंघांची आदलाबदली झाली, तर या दोघांनाही थोपवता येणे शक्य आहे यावर या सर्वांचे एकमत झाल्याचे शहराच्या राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. या राजकारण्यांमध्ये शहरातील सर्वपक्षीय बड्या नेत्यांचा समावेश आहे. हे सर्वजण वेगवेगळ्या राजकीय पक्षात असले तरी महापालिकेच्या अनेक कामांमध्ये व झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांच्या कामांमध्ये अप्रत्यक्ष भागीदार आहेत. फक्त लोकांना दाखवायला म्हणून हे सर्वजण वेगवेगळ्या राजकीय पक्षात राहून एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. पण हे सगळे नेते आतून एकच असल्याचे उघड गुपित आहे.
हे सर्वपक्षीय बडे नेते महाविकास आघाडीच्या जागा वाटपात भोसरी विधानसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव ठाकरे गटाला आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मिळू नये यासाठी प्रयत्न करीत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघ काहीही करून शिवसेना उद्धव ठाकरे गटाने लढू नये यासाठी एका आमदाराकडूनही राज्यातील एका नेत्याला ऑफर दिली जात असल्याची चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मिळायला हवा यासाठी संबंधित आमदार प्रयत्नशील असल्याचे सांगितले जात आहे. तीच खेळी पिंपरी विधानसभा मतदारसंघाबाबतही खेळली जात असल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात पिंपरी मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला न मिळता शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मिळावा यासाठी शहरातील सर्वपक्षीय बडे नेते प्रयत्न करीत आहेत. या बड्या नेत्यांना शहरातील अनेक बिल्डरांचाही पाठिंबा मिळत आहे. अधिकारी, पत्रकार आणि सर्वसामान्यांना शिवीगाळ व ब्लॅकमेल करणे तसेच धमकाविण्यासाठी शहराच्या राजकारणात कुप्रसिद्ध असणाऱ्या माजी नगरसेविका सीमा सावळे यांना शिवसेना उद्धव ठाकरे गटाची उमेदवारी मिळवून देण्याचा या सर्वपक्षीय नेत्यांचा आणि बिल्डरांचा डाव असल्याचे सांगितले जात आहे.
त्यामुळे शहराच्या राजकारणात पडद्यामागे घडत असलेल्या सर्व राजकीय घडामोडींमध्ये रवि लांडगे आणि सुलक्षणा धर-शिलवंत हे दोघे केंद्रबिंदू ठरले आहेत.  रवि लांडगे आणि सुलक्षणा धर-शिलवंत यांनी निवडणूक लढवूच नये यासाठी शहरातील सर्वपक्षीय राजकारण्यांनी खेळलेल्या आर्थिक डावपेचांना यश येऊन महाविकास आघाडीत जागा वाटप होत असताना भोसरी आणि पिंपरी मतदारसंघांची आदलाबदल होते की या दोघांनाही थेट लोकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाला यश मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button