बॅनर न्यूज
लोकसभा निवडणुकीनंतर चिंचवड आणि पिंपरीत भाजप मजबूत; भोसरीत कमळाला “टेन्शन”

पिंपरी : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपची पीछेहाट झाली. त्याचा पिंपरी-चिंचवडच्या राजकारणावर परिणाम होणार का?, याबाबत आता शहरात चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने पिंपरी आणि चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघात आपलीच ताकद असल्याचे दाखवून दिले आहे. दुसरीकडे भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीला एक लाखांचे मताधिक्य देण्याची घोषणा केली होती. मात्र ती हवेत विरली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भोसरी मतदारसंघात भाजपची चिंता वाढू शकते, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
गेल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची मतमोजणी पार पडली. त्यामध्ये महाराष्ट्रात भाजप खासदारांची संख्या थेट २३ वरून ९ वर आली. त्यामुळे केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपची चिंता वाढली आहे. राज्यातील या राजकीय स्थितीचा पिंपरी-चिंचवडच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो, यावर आता चर्चा होऊ लागल्या आहेत. पिंपरी-चिंचवड शहराचा मावळ आणि शिरूर या दोन लोकसभा मतदारसंघात समावेश आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात चिंचवड आणि पिंपरी हे दोन विधानसभा मतदारसंघ, तर शिरूर लोकसभा मतदारसंघात भोसरी विधानसभा मतदारसंघ येतो. मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा विजय झाला, तर शिरूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव झाला.
मावळ मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे शिवसेना शिंदे गटाचे आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये शिंदे गटाची ताकद नगण्य आहे. मतदानाच्या दिवशी सर्व मतदान केंद्रावर बुथ लावता येईल इतकी सुद्धा शिंदे गटाची शहरात ताकद नाही हे वास्तव आहे. तरी सुद्धा चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी शिंदे गटाच्या उमेदवाराला भरभरून मतदान केले. हे सर्व केवळ भाजपामुळेच शक्य झाले. दोन्ही विधानसभा मतदारसंघात भाजपने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली. होम-टू-होम जाऊन भाजपचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महायुतीचा प्रचार केला. बुथ यंत्रणा सक्षमपणे हाताळली. प्रत्येक मतदान केंद्रावर भाजपने बुथ लावून श्रीरंग बारणे यांना तिसऱ्यांदा खासदार करण्यात सिंहाचा वाटा उचलला.
भाजपच्या या प्रचार नियोजनात शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी पायाला भिंगरी लावून काम केले. त्याचा परिणाम म्हणजे महायुतीचे श्रीरंग बारणे यांना पिंपरी विधानसभा मतदारसंघातून १६ हजार ७३२ मतांचे आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातून ७४ हजार ७६५ मतांचे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघात भाजपचेच वर्चस्व आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. मावळचा विजय आणि लोकसभा निवडणुकीत केलेल्या कामाचा तीन महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघात भाजपला फायदा होण्याची शक्यता दिसत आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने निवडणूक लढविली. या पक्षाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील होते. शिरूर मतदारसंघात पिंपरी-चिंचवडमधील भोसरी विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी आढळराव पाटील यांना एक लाखांचे मताधिक्य मिळवून देण्याची घोषणा केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भोसरीत जंगी सभा घेऊन महेश लांडगे यांनी एक लाखांच्या मताधिक्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात भोसरी मतदारसंघातून महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार अमोल कोल्हे यांना ९ हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे आमदार महेश लांडगे यांनी महायुतीसाठी एक लाखांच्या मताधिक्यांची दिलेली घोषणा हवेत विरली आहे. भोसरी मतदारसंघात महायुतीला फटका बसला आहे.
आमदार महेश लांडगे यांनी प्रत्येक गोष्टीत गाजावाजा करण्याची ख्याती प्राप्त केलेली आहे. लोकसभा निवडणुकीतही त्यांनी एक लाखाच्या मताधिक्याचा मोठा गाजावाजा केला. मात्र त्याचा परिणाम मतदारांवर शून्य झाल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. निवडणुकीत महाविकास आघाडीला भोसरी मतदारसंघातून मिळालेले मताधिक्य महेश लांडगे यांचे टेन्शन वाढविणारे आहे. एकंदरीत लोकसभा निवडणूक निकालाचा विचार केल्यास पिंपरी-चिंचवड शहरात भाजपला भोसरी वगळता फारसा चिंता करण्यासारखी राजकीय परिस्थिती अद्याप तरी निर्माण झाल्याचे दिसत नाही. चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपची स्थिती मजबूत दिसत आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघात भाजप निर्णायक भूमिकेत दिसत आहे. तिसरा मतदारसंघ असलेल्या भोसरीमध्ये भाजप थोड्या डळमळीत स्थितीत दिसत असल्याचे चित्र आहे. सप्टेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे आगामी दोन-तीन महिन्यात शहराच्या राजकारणात काय काय घडामोडी घडतात, विरोधक कोणती वातावरण निर्मिती करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.