बॅनर न्यूज

भाजपच्या स्थायी समिती माजी सभापती सीमा सावळे यांना बालाजीनगरमधील झोपडीधारकांचा दणका

रस्त्याने बाधित झोपडीधारकांनी हाकलून लावले; नंतर काही महिलांना हाताशी धरून क प्रभाग कार्यालयासमोर केली स्टंटबाजी

Spread the love

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे जागे झालेल्या भाजपच्या स्थायी समितीच्या माजी सभापती सीमा सावळे यांना भोसरीतील बालाजीनगरमधील गोरगरीब नागरिकांनी बुधवारी चांगलाच दणका दिला. निगडी ते भोसरी या टेल्को रस्त्याच्या रुंदीकरणासाठी बालाजीनगरमधील काही झोपडीधारकांना महापालिकेने नोटीस बजावत घरे काढण्यास सांगितले आहे. त्याविरोधात हे झोपडीधारक बुधवारी सकाळी एकत्र आले. प्रसिद्धीसाठी कायम हपापलेल्या भाजपच्या स्थायी समितीच्या माजी सभापती सीमा सावळे यांना माहिती मिळताच तेथे जाऊन गोरगरीब नागरिकांसमोर त्यांनी जुमलेबाजी करण्याचा प्रयत्न केला. सीमा सावळे यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असल्याचा आधीच अनुभव असलेल्या बालाजीनगरवासीयांनी त्यांना तेथून अक्षरशः हाकलून दिले. त्यानंतर सीमा सावळे यांनी राजकीय शाळा करत काही महिलांना हाताशी धरून महापालिकेच्या क प्रभाग कार्यालयासमोर जात धरणे आंदोलन करून स्टंटबाजी केली. विशेष म्हणजे सीमा सावळे यांच्या घरातीलच व्यक्ती बिल्डर आणि ठेकेदार आहेत. तरीही त्यांनी रस्त्यात घर जाणाऱ्या स्वतःच्या प्रभागातील गोरगरीब नागरिकांना मी माझ्या खर्चाने तुम्हाला घर देते असे सांगण्याचे मोठेपण दाखविले नाही. उलट प्रसिद्धी मिळविण्यासाठी गोरगरीब महिलांच्या भावनेशी खेळण्याचा प्रयत्न केल्याने बालाजीनगर आणि इंद्रायणीनगरमधील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेत २०१७ मध्ये भाजपची पहिल्यांदाच सत्ता आल्यानंतर सत्तेच्या पहिल्याच वर्षी नगरसेविका सीमा सावळे यांना स्थायी समितीचे सभापती करण्यात आले होते. सीमा सावळे या भोसरीतील बालाजीनगरमधून सातत्याने तीनवेळा निवडून आलेल्या आहेत. बालाजीनगर हा झोपडपट्टीचा परिसर आहे. या झोपडपट्टीत राहणारे नागरिक गोरगरीब आहेत. त्यामुळे या गोरगरीब नागरिकांनी सीमा सावळे यांच्यावर मोठा विश्वास ठेवून सलग तीनवेळा निवडून देत त्यांच्यावर मोठे उपकार केले आहेत. मात्र तीनवेळा निवडून देऊनही बालाजीनगरमधील गोरगरीब नागरिकांना मुलांबाळासह दरवर्षी पावसाळ्यात अनेक दिवस आणि रात्र पाण्यामध्ये काढावे लागते, हे वास्तव आहे. जवळच्या कार्यकर्त्यांना किंवा घरातच ठेकेदार असणाऱ्यांना बालाजीनगरमधील कामे मिळवून द्यायची आणि त्यांच्याकडून टक्केवारी घेत निकृष्ट दर्जाची कामे करून घ्यायची आणि वरून मी गरीबांची कशी कैवारी आहे हे दाखवून देण्याचे नाटक सीमा सावळे यांना चांगलेच जमते. त्यांच्या या नाटकी राजकारणाला बालाजीनगरमधील गोरगरीब रहिवासी फसतात आणि पुन्हा सावळे यांनाच मतदान करून त्यांना निवडून देतात असा आजपर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. तसेच निवडणुका जवळ आल्या की बालाजीनगरमधील गोरगरीब महिलांना साड्या आणि इतर वस्तू वाटप करून मत विकत घेण्याची कलाही सीमा सावळे यांना चांगलीच अवगत झाली आहे. मात्र हे नाटक जनतेला कायमच खरे वाटेल असे होत नाही. आता बालाजीनगरमधील जनता चांगलीच जागृत झाली असून, त्यांची गेल्या पंधरा वर्षांपासून कशी फसवणूक सुरू होती, याची जाणीव झाली आहे.
त्यातूनच बालाजीनगरमधील गोरगरीब जनतेने माजी नगरसेविका सीमा सावळे यांना बुधवारी त्यांची जागा दाखविण्याचा प्रयत्न केला.

महापालिकेमार्फत निगडी ते भोसरी या टेल्को रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार आहे. त्यामुळे टेल्को रस्त्याला लागूनच असलेल्या बालाजीनगरमधील काही झोपड्या रूंदीकरणात जाणार आहेत. या बाधित झोपडीधारकांना महापालिका प्रशासनाने नोटीस पाठवून घरे काढून घेण्यास सांगितले आहे. त्याविरोधात हे झोपडीधारक बुधवारी सकाळी एकवटले होते. ही बाब कळताच माजी नगरसेविका सीमा सावळे तेथे आल्या. महापालिकेची निवडणूक जवळ आल्याने झोपडीधारकांना भावनिक करून त्यांना फसविण्याचा आयता मुद्दा सापडल्याने सीमा सावळे यांनी जागेवर जात या झोपडीधारकांसमोरो जुमलेबाजी करण्यास सुरूवात केली. आजपर्यंत केवळ फसवले गेलेल्या झोपडीधारकांना सीमा सावळे यांचा खरा चेहरा लक्षात येताच त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. तुम्ही बिल्डर आहात, तुमच्या घरात तुमचा मुलगा महापालिकेचा ठेकेदार, तुमचा पुतण्या ठेकेदार आहे. तुमचे सर्वस्व असलेले सारंग कामतेकर बिल्डर आहेत, त्यांचे सगळे नातेवाईक महापालिकेचे ठेकेदार आहेत. त्यामुळे रस्ता रुंदीकरणात घरे जाणाऱ्या झोपडीधारकांना तुम्ही स्वतः घरे द्या, अशी मागणी सीमा सावळे यांच्याकडे केली. तसेच जुमलेबाजी करणार असाल, तर इथून चालते व्हा, असे बालाजीनगरमधील जनतेने ठणकावून सांगत सीमा सावळे यांना तेथून हाकलून लावले.

बालाजीनगरवासीयांनी आपले खरे रुप ओळखल्याचे कळताच सीमा सावळे यांनीही तेथून पळ काढणे पसंत केले. त्यानंतर त्यांनी रस्ता रुंदीकरणाने बाधित होणाऱ्या काही महिलांना हाताशी धरून त्यांना क प्रभाग कार्यालयात घेऊन गेल्या. तेथे प्रभाग कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर महिलांसह बसून सीमा सावळे यांनी स्टंटबाजी केली. निवडणूक जवळ आली की सीमा सावळे या अशीच राजकीय स्टंटबाजी करतात याची जाणीव असलेले क प्रभागातील अधिकारी व कर्मचारी सीमा सावळे यांना पाहून गालातल्या गालात हसताना दिसत होते. सीमा सावळे या स्वतः स्थायी समितीच्या सभापती होत्या. सभापती म्हणून महापालिकेच्या तीन अर्थसंकल्पांवर काम केले आहे. तसेच विकासकामांसाठी हजारो कोटी मंजूर करण्याचे काम सभापती म्हणून त्यांनी केले आहे. हे हजारो कोटी खर्च करताना त्यांना बालाजीनगरमधील गोरगरीब झोपडीधारक कधीच दिसला नाही का?, रस्त्याचे रुंदीकरण होणार हे माहीत असतानाही त्याचवेळी स्थायी समितीमध्ये धोरणात्मक निर्णय घेऊन रस्त्यात घरे जाणाऱ्यांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देणे सीमा सावळे यांना शक्य असताना त्यांनी तेव्हा का केले नाही?, असे सवाल आता बालाजीनगरवासीय उपस्थित करत आहेत. तसेच स्थायी समिती सभापती होताच घरात अनेक बिल्डर आणि ठेकेदार तयार झालेल्या सीमा सावळे आपल्या कोट्यवधींच्या संपत्तीमधील काही पैसे रस्त्याने बाधित होणाऱ्या गोरगरीब बालाजीनगरवासीयांना देऊन त्यांना हक्काचे घर मिळवून देणार का?, हे पहावे लागणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button