बॅनर न्यूज
प्रभाग १६ मध्ये भाजपच्या दीपक भोंडवेंचा जोरदार शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल; जनसागराच्या उपस्थितीने विजयाचा निर्धार
"आता बदल घडणारच!"; समीर लॉन्स येथून निघाली भव्य रॅली

पिंपरी : प्रभाग क्रमांक १६ मधील मामुर्डी, किवळे, विकासनगर आणि रावेत-गुरुद्वारा या भागाचा कायापालट करण्याचा निर्धार व्यक्त करत भाजपच्या दीपक मधुकर भोंडवे यांनी मोठ्या उत्साहात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. रावेत येथील ‘समीर लॉन्स’ येथून निघालेल्या भव्य रॅलीने आणि उसळलेल्या जनसागराने संपूर्ण प्रभागाचे लक्ष वेधून घेतले असून विरोधकांचे धाबे दणाणले आहेत.
सकाळी ९ वाजल्यापासूनच समीर लॉन्स परिसरात नागरिक आणि कार्यकर्त्यांनी अलोट गर्दी केली होती. ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘दीपक भाऊ भोंडवे तुम आगे बढो’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. महिला, तरुण आणि ज्येष्ठांचा या रॅलीतील उत्स्फूर्त सहभाग दीपक भोंडवे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करणारा ठरला.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दीपक भोंडवे भावूक झाले. ते म्हणाले, “हा उमेदवारी अर्ज म्हणजे केवळ एक कागद नसून प्रभागातील जनतेचा माझ्यावर असलेला विश्वास आहे. हा लढा केवळ खुर्चीसाठी नसून प्रभाग १६ मधील प्रत्येक नागरिकाच्या हक्कासाठी आणि परिसराच्या शाश्वत विकासासाठी आहे. रस्ते, पाणी, शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत सुविधा घराघरापर्यंत पोहोचवणे हेच माझे प्रथम कर्तव्य असेल.”
समीर लॉन्सपासून सुरू झालेली ही रॅली प्रभाग १६ मधील महत्त्वाच्या भागातून मार्गस्थ झाली. ठिकठिकाणी माता-भगिनींनी दीपक भोंडवे यांचे औक्षण केले, तर ज्येष्ठांनी त्यांना विजयासाठी आशीर्वाद दिले. “आपला माणूस, विकासाचा माणूस” अशी भावना मतदारांमध्ये स्पष्टपणे दिसून येत होती. या भव्य शक्तिप्रदर्शनामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून, प्रभागातील जनमत आता पूर्णपणे परिवर्तनाच्या आणि विकासाच्या बाजूने असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
या ऐतिहासिक प्रसंगी प्रभागातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, प्रतिष्ठीत नागरिक, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. “आता बदल घडणारच” आणि “विकासाची नवी वाटचाल सुरू झाली” असा विश्वास उपस्थितांनी यावेळी व्यक्त केला. दीपक भोंडवे यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग १६ मध्ये आता एक वेगळीच चुरस निर्माण झाली आहे.



