बॅनर न्यूज

कुत्र्याच्या नसबंदीत देखील पैसे खाणाऱ्यांच्या हातात पिंपरी-चिंचवडची सूत्रे द्यायची आहेत का?

अजित पवार यांचा आकुर्डीतील सभेत पिंपरी-चिंचवडकरांना खडा सवाल?; भाजपला खड्यासारखे बाजूला करण्याचे शहवासीयांना आवाहन

Spread the love
पिंपरी : कुत्र्यांच्या नसबंदीत देखील पैसे काढण्याचे काम भाजपने केले. अशा लोकांच्या हातात पिंपरी-चिंचवड महापालिकेची सूत्रे द्यायची आहेत का?, असा खडा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आकुर्डी येथील सभेत पिंपरी-चिंचवडकरांना केला. लोकांना भावनिक करून स्वतःची पोळी भाजण्याचे काम महापालिका निवडणुकीत पिंपरी-चिंचवडकरांनी कायमचे थांबवावे. २०१७ ला केलेल्या चुकीची पुनरावृत्ती न करता भ्रष्टाचाऱ्यांना खड्यासारखे बाजूला करा, असे आवाहन अजित पवार यांनी केले. 
 
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १४ आणि १५ मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आकुर्डी गावठाण येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विजयी संकल्प सभा घेतली. यावेळी प्रभाग क्रमांक १५ चे उमेदवार धनंजय काळभोर, प्रीतमराणी शिंदे, सरिता साने, नीलेश शिंदे आणि प्रभाग क्रमांक १४ चे उमेदवार विशाल काळभोर, वैशाली काळभोर, अरुणा लंगोटे, प्रमोद कुटे यांच्यासह माजी नगरसेवक विठ्ठलराव काळभोर, उर्मिला काळभोर, शंकरराव पांढारकर, नीलेश पांढारकर यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक माजी नगरसेवक तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 
 
अजित पवार म्हणाले, पिंपरी-चिंचवड आणि माझे नाते १९९१ पासूनचे आहे. सर्वांना सोबत घेऊन शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला. पाच पंचवार्षिक निवडणुकीत पिंपरी-चिंचवडकरांनी मला साथ दिली. शहराचा कायापालट होत असताना आता पिण्याचे पाणी दिवसाआड मिळत आहे. नियोजनशून्य कारभार आहे. महापालिकेत सत्ता आल्यानंतर पिंपरी-चिंचवडकरांना मी नळाद्वारे दररोज पाणी देईन. टँकरमाफिया बंद करेन. दररोज पाणी मिळणे हा तुमचा हक्क आहे. हायटेक आरोग्य सुविधा देणार आहे. प्रदूषणमुक्त पिंपरी-चिंचवड महापालिका करणार आहे. 
 
विरोधकांमध्ये व्हिजन असणारा कोणीही नाही. महापालिकेत भोंगळ कारभार, भ्रष्टाचार, रिंग सुरू आहे. महापालिकेची कामे बगलबच्चे आणि भावंडांना दिली जातात. त्यामुळे महापालिका कर्जबाजारी झाली आहे. चार हजार कोटींची बिले देणे बाकी आहे. गेल्या ९ वर्षात चांगल्या शहराला गालबोट लावण्याचा काम झाले आहे. अशांना खड्यासारखे बाजूला करा. भाजपने पिंपरी-चिंचवड शहराला ९ वर्षे दृष्ट लावण्याचे काम केले आहे. मी अनेकांना संधी देऊन नगरसेवक, महापौर, स्थायी समिती अध्यक्षपद दिले. तरीही काही लोक सोडून गेले. मी माहिती घेतल्यानंतर आर्थिक अडचणीत सापडल्याचे सांगून हे शहाणे तिकडे गेल्याच कळले. यांची घरेदारे भरण्यासाठी हे तिकडे गेले आहेत. भाजपने ९ वर्ष मागच्या लुटून खाल्ले. प्रत्यक्षात कामे न करताच बिले काढली जातात. यांना जनाची नाही मनाची सुद्धा काही वाटत नाही. यांनी ९ वर्षात फक्त भ्रष्टाचार करणे एवढाच कार्यक्रम केला. यांच्या दादागिरीमुळे, दंडेलशाहीमुळे महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी नोकरी सोडली. त्यामुळे २०१७ ला झालेल्या चुकीची पुनरावृत्ती आता होऊ देऊ नका, असे आवाहन त्यांनी पिंपरी-चिंचवडकरांना केले.
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button