बॅनर न्यूज

चिंचवड विधानसभा मतदारसंघात घराणेशाहीवरून राजकीय घमासान

Spread the love
पिंपरी : विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच चिंचवड मतदारसंघात भाजपमध्ये घराणेशाहीवरून राजकीय घमासान सुरू झाले आहे. या मतदारसंघात भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांना महायुतीची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या उमेदवारीला भाजपचे माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, शत्रुघ्न काटे यांच्यासह मूठभर नगरसेवकांनी विरोध करण्यासाठी राजकीय घराणेशाहीचे हत्यार उपसले आहे. परंतु, जगताप यांच्या घराणेशाहीवर बोलणारे चंद्रकांत नखाते हे सुद्धा राजकीय घराणेशाहीच जोपासणारे आहेत याचा विसर मात्र या माजी नगरसेवकांना पडला असल्याचे पाहायला मिळत आहे. स्वतः दोनवेळा नगरसेवक, पत्नी नगरसेविका, विहीण नगरसेविका, व्याही महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग मंडळाचे उपाध्यक्ष, जावई भाजप युवा मोर्चाचा पदाधिकारी, जावयाचे आजोबा नगरसेवक, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष अशी नखाते यांची राजकीय घराणेशाही आहे. त्यामुळे घराणेशाहीच्या मुद्द्यावर सुरू असलेले चिंचवड मतदारसंघाचे राजकारण कोणते वळण घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
 
केवळ पिंपरी-चिंचवड शहरच नव्हे तर राज्याच्या राजकारणात चिंचवड विधानसभा मतदारसंघ हा भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हक्काचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. त्यांनी या मतदारसंघात सलग तीनवेळा विजय मिळविला आहे. त्यामुळे या मतदारसंघावर दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांची मजबूत पकड होती. मतदारसंघावर मजबूत पकड असली तरी त्यांनी घरातील कोणालाही राजकारणात पुढे आणून घराणेशाही जोपासण्याचे काम केले नाही. दिवंगत लक्ष्मण जगताप यांचे लहान बंधू शंकर जगताप हे केवळ एकदाच पिंपरी-चिंचवड महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी घरातील कोणत्याच सदस्याला राजकीय पदावर बसविले नाही. त्याऐवजी जवळच्या कार्यकर्त्यांना राजकारणात संधी देण्याचे काम दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले. मात्र त्यांच्या निधनानंतर भाजपने त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी देऊन आमदार केले. त्यानंतर दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे लहान बंधू शंकर जगताप यांना पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे अध्यक्षपदी संधी दिली आहे.
 
आता पुन्हा विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असताना दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शंकर जगताप हे चिंचवड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित आहे. मात्र त्यांच्या उमेदवारीला भाजपमधीलच मूठभर नगरसेवकांनी विरोध सुरू केल्याचे काही दिवसांपासूनचे चित्र आहे. शंकर जगताप यांच्याएवढी राजकीय ताकद दाखविता येत नसल्याने या मूठभर नगरसेवकांनी जगताप कुटुंबियांच्या घराणेशाहीचा मुद्दा पुढे करून भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न चालविला आहे. या मूठभर नगरसेवकांचे नेतृत्व माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते आणि शत्रुघ्न काटे करीत आहेत. यातील चंद्रकांत नखाते हे सुद्धा राजकीय घराणेशाही जोपसणारे आहेत याचा सोईस्कर विसर या माजी नगरसेवकांना पडला असल्याचे पाहायला मिळत आहे.  
 
चंद्रकांत नखाते हे स्वतः दोनवेळा पिंपरी-चिंचवड महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच त्यांच्या पत्नी देखील नगरसेविका होत्या. एवढेच नाही तर चंद्रकांत नखाते यांच्या विहीण सुनीता तापकीर या सुद्धा नगरसेविका होत्या. नखाते यांचे जावई भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी आहेत. तसेच व्याही हेमंत तापकीर हे महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग मंडळाचे उपाध्यक्ष होते. त्याचप्रमाणे जावयाचे आजोबा हे सुद्धा नगरसेवक होते. तसेच प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष होते. त्यामुळे राजकीय घराणेशाही जोपासणारेच दुसऱ्याच्या घराणेशाहीबाबत बोलत असल्याचे विचित्र चित्र चिंचवड विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे चंद्रकांत नखाते हे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे दोनवेळा नगरसेवक झाल्यानंतर त्यानंतर त्यांचा महापालिका निवडणुकीत वारंवार पराभव होत होता. अशावेळी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी २०१७ मध्ये चंद्रकांत नखाते यांना मदत करून पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आणले होते.
आता तेच नखाते दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या राजकीय घराणेशाहीबाबत कसे काय बोलू लागले?, जगताप कुटुंबाचे राजकारण म्हणजे घराणेशाही आणि चंद्रकांत नखाते यांचे राजकारण म्हणजे कोणती शाही?, असा प्रश्न भाजपच्याच कार्यकर्त्यांना पडला आहे. चिंचवड मतदारसंघात शंकर जगताप यांच्याकडे भाजपचे निवडून येणारे उमेदवार म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी ही निश्चित मानली जाते. त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर घराणेशाहीचा मुद्दा तापवणारे भाजपचे हे मूठभर नगरसेवक काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button