रावेत-मामुर्डी-किवळे प्रभागात भाजपच्या दिपक भोंडवे यांनी प्रचाराचा नारळ फोडला
विकासनगर येथे दत्त मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराचा केला श्रीगणेशा; मतदारांकडून जोरदार स्वागत

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक १६, रावेत-मामुर्डी-किवळे-वाल्हेकरवाडीमधील भाजपचे इच्छुक उमेदवार दिपक भोंडवे यांनी किवळे, विकासनगर येथील दत्तमंदिरात दर्शन घेऊन गुरूवारी प्रचाराला दणक्यात सुरूवात केली. त्यामुळे या प्रभागात निवडणूक प्रचाराचा श्रीगणेशा झाला असून, जनतेचा आशीर्वाद आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांचा विकसित भारताचा विकासाचा अजेंडा घेऊन मी महापालिका निवडणुकीला सामोरे जात आहे, असा विश्वास दिपक भोंडवे यांनी यावेळी व्यक्त केला. दिपक भोंडवे यांनी दत्त मंदिरात दर्शन घेऊन मंदिराबाहेर येताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत तसेच काही महिलांनी दिपक भोंडवे यांचे औक्षण करून जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला प्रारंभ झाला आहे. त्याची सुरूवात प्रभाग क्रमांक १६, रावेत-मामुर्डी-किवळे-वाल्हेकरवाडी येथून झाली आहे. या प्रभागातील उच्चशिक्षित उमेदवार दिपक भोंडवे हे भारतीय जनता पार्टीकडून निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. त्यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. तसेच उमेदवारीसाठी पक्षाला अर्जही सादर केला आहे. त्यांनी पक्षामार्फत घेण्यात आलेल्या मुलाखतीतही सहभागी होत प्रभाग क्रमांक १६ मधील सर्वसाधारण खुला वर्गासाठी असलेल्या “ड” जागेवर उमेदवारी मागितली आहे. त्यानंतर त्यांनी आता प्रभागात प्रत्यक्ष प्रचाराचाही श्रीगणेशा केला आहे. गुरूवारी (दि. १८) सकाळी किवळे, विकासनगर येथील दत्त मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराला सुरूवात केली.
पदयात्रेला मतदारांचा जोरदार प्रतिसाद
प्रचाराच्या पहिल्याच दिवशी दिपक भोंडवे यांनी किवळे भागातील प्रमुख वस्त्या, गल्ल्यांमध्ये पदयात्रा काढली. ‘घरोघरी प्रचार’ या मोहिमेवर भर देत त्यांनी ज्येष्ठ नागरिक आणि महिलांशी थेट संवाद साधला. अनेक ठिकाणी महिलांनी दिपक भोंडवे यांचे औक्षण करून जोरदार स्वागत केले. प्रभागातील नागरिकांशी थेट निगडीत असलेले स्थानिक प्रश्न, प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्यासोबतच प्रभागात भविष्यात राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती त्यांनी नागरिकांना दिली.
यावेळी दिपक भोंडवे म्हणाले, संपूर्ण देशाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तीनवेळा विश्वास दाखविला आहे. तसेच राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विकासाचा अजेंडा घेऊन महाराष्ट्राची सेवा करत आहेत. चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांनीही या मतदारसंघाचा कायापालट करण्याचे लक्ष ठेवले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मी प्रभाग क्रमांक १६ मधील नागरिकांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देणार आहे. आपल्या प्रभागातील कानाकोपऱ्याचा विकास करण्यासाठी मी आजपासून मतदारांना साद घालण्यास सुरूवात केली आहे. माझा माझ्या प्रभागातील मतदारांवर पूर्ण विश्वास असून, हे मतदार भाजपकडून केल्या जाणाऱ्या ठोस आणि शाश्वत विकासाच्या बाजूने उभे राहतील आणि महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला भरघोस मतांनी निवडून देतील, असा विजयाचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.



