बॅनर न्यूज

आकुर्डी गावठाण आणि निगडी प्राधिकरणात नागरिकांमध्ये बदलाची भावना

सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांना दुतोंडीपणा भोवणार

Spread the love

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग १५, आकुर्डी गावठाण – गंगानगर – निगडी वाहतूकनगरी आणि प्राधिकरणातील नागरिकांमध्ये यंदा स्पष्टपणे बदलाची भावना निर्माण होताना दिसत आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिलेले विकास प्रश्न, कागदावरच अडकलेली कामे आणि मूलभूत सुविधांबाबतची अस्वस्थता आता थेट चर्चेचा विषय बनली आहे. वर्षभरात दोन-चार कार्यक्रम घेऊन नागरिकांच्या संपर्कात राहण्याचा देखावा करणाऱ्यांना यंदा विश्रांती देऊन नागरिकांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्यांना संधी देण्याचा नागरिकांचा विचार पक्का दिसत आहे. चुकीच्या विकासकामांना रस्त्यावर उतरून विरोध करण्याची वेळ या प्रभागातील नागरिकांवर आली. हाच विरोध नगरसेवकांनी महापालिकेत केला असता, तर प्रभागातील नागरिकांवर ही वेळ आलीच नसती. त्यामुळे प्रभागातील नागरिकांचा विद्यमान नगरसेवकांवर प्रचंड रोष दिसून येत आहे. त्यातून प्रभागात यंदा बदल हा निश्चित असल्याचे मानले जात आहे. 

प्रभाग १५, आकुर्डी गावठाण – गंगानगर – निगडी वाहतूकनगरी आणि प्राधिकरणातील रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठ्याचा अनियमितपणा, ड्रेनेज व स्वच्छतेचे प्रश्न, अपुऱ्या आरोग्य सुविधा आणि युवकांच्या रोजगाराबाबत असलेली अनिश्चितता या प्रश्नांमुळे नागरिकांमध्ये “जुनेच चालू नको” अशी ठाम भावना तयार झाली आहे. निवडणूक आली की दिसणारे आणि नंतर गायब होणारे नेतृत्व नको, तर कायम संपर्कात राहणारा, जबाबदार लोकप्रतिनिधी हवा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांकडून सुरू असलेल्या प्रचार फेऱ्यांमध्ये नागरिक विचार करत असून, केवळ आश्वासनांवर समाधान मानण्याची तयारी दिसत नाही. प्रत्यक्षात काम करून दाखवणाऱ्या नेतृत्वालाच संधी द्यावी, असा सूर प्रभागातील अनेक भागांमधून उमटू लागला आहे.

प्राधिकरण भागात महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या हरित सेतू प्रकल्पाला येथील नागरिकांनी रस्त्यावर उतरून तीव्र विरोध केला. त्यावेळी या प्रभागाचे नगरसेवक सुद्धा रस्त्यावर आले. मात्र यातील एकाही नगरसेवकाने महापालिकेत जाऊन या प्रकल्पाच्या मंजुरीवेळी कोणताही विरोध केला नाही. महापालिकेत चुप्पी आणि नागरिक रस्त्यावर उतरल्यानंतर दिखाऊपणा करण्यासाठी नगरसेवकांनी सुद्धा रस्त्यावर उतरून आपल्यातील दुतोंडीपणा दाखवला होता. मग हे नगरसेवक महापालिकेत जाऊन करतात काय?, असा प्रश्न येथील सुज्ञ जनतेला पडलेला आहे. त्यामुळेच प्रभाग क्रमांक १५ मधील घराघरात होणाऱ्या संवादातून, स्थानिक बैठका आणि प्रचार सभांमधून बदलाची चाहूल अधिक ठळक होत आहे. प्रभागाच्या विकासासाठी नव्या विचारांचे, जबाबदारी स्वीकारणाऱ्या आणि पारदर्शक कारभार करणाऱ्या नेतृत्वाची गरज असल्याची भावना नागरिकांमध्ये बळावत आहे. यंदाची ही निवडणूक केवळ पक्षांची नसून, कागदी विकास विरुद्ध प्रत्यक्ष विकास यामधील निवड ठरणार असल्याची चर्चा प्रभाग क्रमांक १५ मध्ये जोर धरू लागली आहे. त्यामुळे या प्रभागात नागरिकांचा कौल कोणाच्या बाजूने जाणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button