बॅनर न्यूज

“अजितदादा चाटून खा, पुसून खा” म्हणणाऱ्या माजी नगरसेविकेचा राष्ट्रवादीत प्रवेश

राष्ट्रवादीची पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता आल्यास चाटून, पुसून नाही तर संपूर्ण भांडं गिळंकृत होणार

Spread the love

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मागील निवडणुकीत “अजितदादा चाटून खा, पुसून खा”, अशा घोषणा देत राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारावर घसा कोरडा होईपर्यंत ओरडणाऱ्या भाजपच्या माजी नगरसेविका सीमा सावळे यांनी आता स्वतःच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे. २०१७ च्या निवडणुकीआधी सत्तेत येण्यासाठी राष्ट्रवादीला भ्रष्टाचारी पक्ष ठरवून स्वतः सत्तेत आल्यानंतर मात्र या माजी नगरसेविकेने स्थायी समिती सभापतीपदाच्या माध्यमातून त्यांच्या सात पिढ्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे उघड राजकीय गुपीत आहे. अशा भ्रष्ट महिलेला अजितदादांनी पक्षात प्रवेश देऊन पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना काय संदेश द्यायचा आहे. पुन्हा सत्तेत येऊन महापालिकेत आणखी भ्रष्टाचाराचा कळस गाठायचा आणि पिंपरी-चिंचवडकरांचे केवळ पैसाच नाही तर संपूर्ण रक्तच शोषण करायचे आहे का?, असा सवाल या माजी नगरसेविकेच्या प्रभागातील सामाजिक कार्यकर्त्या छायाताई सरवदे यांनी केला आहे.  

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये भाजप आणि शिवसेनेतील (शिंदे गट) काही नगरसेवकांचा मंगळवारी प्रवेश झाला. त्यामध्ये एक प्रवेश लक्ष वेधून घेणारा ठरला आहे. भाजपच्या माजी नगरसेविका सीमा सावळे यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सीमा सावळे यांना पक्षात प्रवेश दिला आहे. २०१७ मध्ये महापालिकेत प्रथमच भाजपची सत्ता आल्यानंतर सीमा सावळे यांना भाजपने पहिल्याच वर्षी स्थायी समितीचे सभापतीपद दिले होते. या पदावर बसणाऱ्या व्यक्तीकडे महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असतात, असे मानले जाते. या तिजोरीच्या चाव्या घेऊन सीमा सावळे यांनी महापालिकेत कधी नव्हे तो भ्रष्टाचाराचा कळस गाठला होता. सीमा सावळे यांच्या कार्यकाळात तीन हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे अनेक पुरावे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी वेळोवेळी माध्यमांसमोर मांडले होते. एवढेच नाही तर माजी नगरसेवक मारूती भापकर यांनीही सीमा सावळे यांच्या स्थायी समिती सभापतीपदाच्या कार्यकाळात महापालिकेच्या प्रत्येक कामाच्या मंजुरीत झालेल्या कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचे पुरावे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वेळोवेळी सादर केले होते.

महापालिकेत भाजप सत्तेत येण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने स्थायी समितीच्या माध्यमातून सुई जरी खरेदी करण्याचा प्रयत्न केला, तर त्यात किती लाखोंचा आणि कोट्यवधींचा भ्रष्टाचार आहे, हे घसा कोरडा होईपर्यंत माजी नगरसेविका सीमा सावळे ओरडून ओरडून पिंपरी-चिंचवडकरांना सांगत होत्या. इतकेच काय महापालिकेचे सभागृह असो की राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराविरोधात केले जाणारे आंदोलन असो प्रत्येक ठिकाणी सीमा सावळे या अजित पवार यांच्या नावाने बोंबाबोंब करत असे. “अजितदादा चाटून खा, पुसून खा”, अशा घोषणांनी त्या तेथील परिसर दणाणून सोडायच्या. अजितदादांना चाटून खा, पुसून खा म्हणणाऱ्या सीमा सावळे यांना भाजपने स्थायी समितीचे सभापतीपद देताच त्यांनी त्यांच्या सात पिढ्या बसून खातील एवढा भ्रष्टाचार केल्याचे उघड गुपित आहे. सीमा सावळे आणि त्यांचे गुरू सारंग कामतेकर हे आता महापालिकेचे ठेकेदार बनले आहेत. ते दुसऱ्याच्या नावाने कोट्यवधींची कामे घेतात हे सुद्धा उघड गुपित आहे. तसेच ते बिल्डर सुद्धा झाले आहेत. एवढेच नाही तर पिंपरी-चिंचवडमधील सर्वाधिक उच्चभ्रू लोकांची वस्ती असलेल्या रावेतजवळच्या एका गृहनिर्माण प्रकल्पात राहण्यास गेले आहेत. या प्रकल्पातील एका फ्लॅटची किंमत कोट्यवधींच्या घरात असल्याचे सांगितले जाते. सीमा सावळे आणि सारंग कामतेकर यांच्याकडे एवढा पैसा आला कोठून?, असा सवाल उपस्थित होत आहे.  स्थायी समितीच्या सभापतीपदावर बसून पिंपरी-चिंचवडकारांची लूट करून कमविलेला हा पैसा आहे हे उघड आहे.

याच सीमा सावळे तिकडे उच्चभ्रू महागड्या फ्लॅटमध्ये राहायला गेल्या असल्या तरी त्यांना बालाजीनगर-इंद्रायणीनगर या प्रभाग क्रमांक ८ मधून निवडून यायचे आहे. या प्रभागातील गोरगरीब जनतेने सीमा सावळे यांना तीन वेळा नगरसेविका म्हणून निवडून दिले आहे. विशेषतः बालाजीनगर हा झोपडपट्टीचा परिसर आहे. या झोपडपट्टीतील नागरिकांनी विश्वासाने सीमा सावळे यांना निवडून दिले होते. मात्र येथील झोपडीधारक आहे तिथेच राहिला असून, त्यांची लूट करून सीमा सावळे मात्र उच्चभ्रू लोकांची वस्ती असलेल्या फ्लॅटमध्ये राहायला गेल्या आहेत. भ्रष्टाचाराचे कारनामे पाहून आणि जाईल तेथे ब्लॅकमेल करण्याचा स्वभाव पाहून भाजपने सीमा सावळे यांना खड्यासारखे बाजूला केले आहे. त्यामुळे आता सीमा सावळे या  ज्यांना भ्रष्टाचारी म्हणून बदनाम केले, त्या अजित पवार यांच्या आश्रयाला गेल्या आहेत. त्यामुळे महापालिकेत सत्ता आली तर चाटून, पुसून नाही तर सगळे भांडेच गिळून टाका, अशी उपरोधिक टिका बालाजीनगर येथील सामाजिक कार्यकर्त्या छायाताई सरवदे यांनी केली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button