बॅनर न्यूज

राहुल कलाटे यांचा भाजप प्रवेश; जगताप कुटुंबापासून दुरावलेले पुन्हा जगताप कुटुंबासोबतच!

Spread the love
पिंपरी : वाकडचे माजी नगरसवेक राहुल कलाटे यांच्या भाजप प्रवेशामुळे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात चिंचवड विधानसभेचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा मिळत आहे. राहुल कलाटे यांच्या राजकारणाची सुरूवात दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर कार्यकर्ते म्हणूनच झाली होती. राजकारणात प्रत्येकाला सर्वांच्या पुढे जावे वाटते. त्यानुसारच राहुल कलाटे यांनीही दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्याविरोधात बंडाचे निशाण फडकावून चिंचवड मतदारसंघात विरोधकाची जागा घेतली होती. परंतु, आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने जगताप कुटुंबापासून दुरावलेले, पुन्हा जगताप कुटुंबासोबतच, अशी राजकीय स्थिती निर्माण झाली आहे. 
 
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू झाले आहे. विशेषतः चिंचवड विधानसभा मतदारसंघातील काही महत्त्वाच्या माजी नगरसेवकांचे भाजपमध्ये झालेले प्रवेश लक्षवेधी बनले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने वाकडचे माजी नगरसेवक राहुल कलाटे, सांगवीचे माजी नगरसेवक प्रशांत शितोळे आणि पिंपळेगुरवचे माजी नगरसेवक नवनाथ जगताप यांचा समावेश आहे. हे तिघेही चिंचवड विधानसभेचे माजी आमदार दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या मुशीत तयार झालेले शहरातील राजकारणी म्हणून ओळखले जातात. प्रशांत शितोळे आणि नवनाथ जगताप या दोघांनीही पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापतीपद भूषविले आहे. त्यांना दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनीच या पदावर बसविले होते. वाकडचे नगरसेवक राहुल कलाटे यांना देखील दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनीच कायम राजकीय बळ देण्याचे काम केले होते.
२००० ते २०१४ या काळात जिथे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप तिथे राहुल कलाटे, प्रशांत शितोळे, नवनाथ जगताप आणि शंकर जगताप असे चित्र होते. मात्र २०१४ मध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचे हे तीनही प्रमुख शिलेदार हळूहळू त्यांच्यापासून दुरावण्यास सुरूवात झाली. त्यापूर्वीच राहुल कलाटे यांनी शिवसेनेचा रस्ता धरला होता. २०१७ च्या महापालिका निवडणुकीपासून प्रशांत शितोळे आणि नवनाथ जगताप हे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्यामध्ये मोठी राजकीय दरी निर्माण झाली. राहुल कलाटे, प्रशांत शितोळे आणि नवनाथ जगताप हे तिघेही दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे राजकीय विरोधक म्हणून आपले राजकीय बस्तान बसविण्यासाठी धडपड करत होते. मात्र जगताप यांच्यापासून दुरावल्यानंतर या तिघांनाही फारसा राजकीय सूर गवसला नाही. अखेर या तिघांनीही दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू व चिंचवड विधानसभेचे विद्यमान आमदार शंकर जगताप यांच्यासोबत जमवून घेतले आणि आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे एकेकाळी जगताप कुटुंबापासून दुरावलेले राहुल कलाटे, प्रशांत शितोळे आणि नवनाथ जगताप पुन्हा जगताप कुटुंबासोबत अशी राजकीय स्थिती निर्माण झाली आहे.     
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button