बॅनर न्यूज
पिंपरी-चिंचवडमध्ये जंगलराज; भाजपच्या प्रदेश महिला पदाधिकाऱ्याला पोलीस ठाण्यातच मारहाण
भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांना पोलिसांचे अभय

पिंपरी : भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांनी पाळलेल्या पुरूष व महिला गुंडांनी भाजपच्याच युवा मोर्चा प्रदेश सचिव तेजस्विनी कदम यांना थेट पोलीस ठाण्यातच मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढेच नाही तर या गुंडांनी तेजस्विनी कदम यांच्या घरावर आणि कारवरही हल्ला करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांनी तुला मारून टाकायला सांगितले आहे, अशी उघड भाषा हे गुंड बोलत आहेत. याप्रकरणी तेजस्विनी कदम यांनी अनुप मोरे यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या गुंडांच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र पोलिसांनी नेहमीप्रमाणे सत्ताधारी भाजपचा पदाधिकारी म्हणून अनुप मोरे यांच्या विरोधात कोणताही गुन्हा दाखल न करता केवळ त्याने पाळलेल्या गुंडांवर गुन्हा दाखल करून पिंपरी-चिंचवडमधील जंगलराजवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे.
तेजस्विनी कदम या पिंपरी-चिंचवड भाजप युवती आघाडीच्या माजी शहराध्यक्षा आहेत. सध्या त्या पक्षाच्या युवा मोर्चा प्रदेश सचिव म्हणून काम करत आहेत. भाजपचे युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांनी पाळलेल्या काही पुरूष व महिला गुंडांनी सोमवारी तेजस्विनी कदम यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. हे सर्व गुंड ते राहत असलेल्या निगडी प्राधिकरण येथील घरावर चाल करून गेले होते. तेथे त्यांनी तेजस्विनी कदम यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न केला. तू एकटी राहतेस, अनुप मोरेने तुला मारून टाकायला सांगितले आहे. तुला अपघातात गाडीने उडवू, आमचे आमच्या दादावर खूप प्रेम आहे. तुला बदनाम करू, तुझं जगणं मुश्किल करून टाकू, अनुप मोरे हा आमचा बाप आहे. तो आम्हाला सांभाळून घेईल, अशा भाषेत जिवे मारून टाकण्याची उघडउघड धमकी दिली. हा सर्व प्रकार पाहून घाबरलेल्या तेजस्विनी कदम या स्वतःच्या कारमधून (एमएच १४ एलजी ९९६९) जावू लागताच घरावर चाल करून आलेल्या गुंडांनी कारला घेराव घातला. तसेच कारच्या पाठीमागील काच फोडली.
त्यानंतर तेजस्विनी कदम यांनी कसाबसा आपला जीव वाचवून एका मित्राच्या गाडीतून चिंचवड पोलीस ठाणे गाठले. भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्या गुंडांनी तेजस्विनी कदम यांचा पाठलाग करत चिंचवड पोलीस ठाण्यात प्रवेश केला. पोलिस ठाण्याच्या आत अधिकाऱ्यांच्या समोरच तेजस्विनी कदम यांना मारहाण केली. हा सर्व प्रकार घडल्यानंतर तेजस्विनी कदम यांनी अनुप मोरे यांच्यासह त्यांनी पाळलेल्या गुंडांच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तब्बल आठ ते नऊ तासानंतर चिंचवड पोलिसांनी अनुप मोरे यांच्या विरोधात कोणताही गुन्हा दाखल न करता दोन महिलांसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस हे सत्ताधारी भाजपच्या बड्या धेंड्यांनी काहीही केले तरी त्यांना या देशातील कायदा लागू होत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. पिंपरी-चिंचवडमधील जंगलराजवर पोलिसांनीच पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे.
सत्ताधारी भाजपमधील एक महिला पदाधिकारीच सुरक्षित नसून, सर्वसामान्यांनी या पोलिसांकडून सुरक्षेची अपेक्षा कशी ठेवायची?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अनुप मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी तेजस्विनी कदम चिंचवड पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांना जाब विचारताना “हा देश माझा आहे, हा कायदा माझा आहे”, असे म्हणत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे. त्यावेळी तेथील पोलीसांची देहबोली ही “हा देश आणि येथील कायदे सत्ताधारी आणि पैसेवाल्यांसाठी नसल्याचे” स्पष्टपणे सांगत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारभाराबाबत संताप व्यक्त होत आहे.



