बॅनर न्यूज

पिंपरी-चिंचवडमधील भाजपची दहशत आणि दादागिरी अजित पवार मोडून काढणार

पिंपरी-चिंचवडमध्ये घड्याळ आणि तुतारी एकत्र लढणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून घोषणा

Spread the love
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्रित लढणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी केली. राष्ट्रवादीचा कोणता गट किती जागा लढणार याबाबत त्यांनी सांगण्यास नकार दिला. त्याबाबत येत्या दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आपापल्या चिन्हावर लढणार की घड्याळ या एकाच चिन्हावर लढणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. 
 
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. त्यानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तळवडे येथे सभा झाली. यावेळी माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. 
महापालिका निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष हे दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यानुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिका राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र लढणार असे राजकीय चित्र तयार झाले होते. मात्र अजित पवार गटाने पुणे महापालिका निवडणूक दोन्ही गटांनी घड्याळ याच चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव समोर आणला. या प्रस्तावाला शरद पवार गटाने नकार दिला. त्यामुळे पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र न येता स्वतंत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेबाबत दोन्ही गट काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 
 
या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडच्या तळवडे भागात झालेल्या प्रचार शुभारंभाच्या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच कोणता गट किती जागा लढवणार हे मात्र सांगण्यास त्यांनी नकार दिला. त्याबाबत येत्या दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल असे त्यांनी सांगितले. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस उरले आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणू राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकाच म्हणजे घड्याळ चिन्हावर लढणार की आपापल्या चिन्हावर लढणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. 
 
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या वाढलेल्या दादागिरीला लक्ष्य केले. पिंपरी-चिंचवडकरांनी भूलथापा, दादागिरी आणि धाकदपटशहाला बळी पडू नये. शहरातील दहशत आणि दादागिरी पूर्णपणे नेस्तनाबूत करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात द्या, असे आवाहन त्यांनी केले. पिंपरी-चिंचवड महापालिका ही आशिया खंडातील श्रीमंत महापालिका होती. महापालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता असताना कधीही कर्ज काढावे लागले नाही. महापालिकेला कर्जबाजारी व्हावे लागले नाही. मात्र आता प्रत्येक कामात रिंग सुरू आहे. भ्रष्टाचार बोकाळला आहे. महापालिकेला कर्जबाजारी केलेल्यांना बाजूला करायचे आहे, अशा शब्दांत त्यांनी भाजपच्या कारभारावर टिकास्त्र सोडले.
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button