राष्ट्रवादीच्या उमेदवार सीमा सावळे यांच्या संपत्तीत सहा वर्षांत तब्बल ४ हजार ३०० पट वाढ!
प्रभाग क्रमांक८, इंद्रायणीनगर-बालाजीनगरमधील नागरिकांमध्ये संताप; उत्पन्नाच्या स्त्रोतांवर गंभीर प्रश्नचिन्ह

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८, इंद्रायणीनगर-गवळीमाथा-बालाजी
पिंपरी-चिंचवड शहरात सध्या सगळीकडे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या मैदानात असणाऱ्या सर्व उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे आपल्या संपत्तीचे शपथपत्र दाखल केले आहे. त्या शपथपत्रानुसार महापालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक ८ मधील अ जागेवर लढणाऱ्या माजी नगरसेविका सीमा सावळे यांच्या सपंत्तीत सहा वर्षात तब्बल ४ हजार ३०० पट वाढ झाल्याचे समोर आले आहे. हा प्रभाग झोपडपट्टी आणि सधन भागाचा समावेश असलेला आहे. विशेषतः बालाजीनगर झोपडपट्टी ही या प्रभागातील सर्वात चर्चिला जाणारा भाग म्हणून ओळखला जातो. या झोपडपट्टीतील गोरगरीब झोपडीधारकांनी सीमा सावळे याना कायम साथ दिली आहे. या गोरगरीब झोपडीधारकांनी सीमा सावळे यांना महापालिकेवर तीन-तीन वेळा निवडून दिले आहे. हा झोपडीधारक आहे तिथेच राहिला असून, सीमा सावळे मात्र कोटींच्या कोटी उड्डाणे मारून सहा वर्षात आपली संपत्ती तब्बल ४ हजार ३०० पट वाढविण्यात यशस्वी झाल्या आहेत.
सीमा सावळे यांनी २०१७ मध्ये याच प्रभागातून भाजपकडून निवडून लढविताना निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या शपथपत्रात आपली स्थावर आणि जंगम मालमत्ता २ लाख ३२ हजार रुपये नमूद केले होते. या निवडणुकीत त्या निवडून आल्या. भाजपने पहिल्याच वर्षी त्यांना स्थायी समितीचे सभापतीपद दिले होते. त्यांनी २०१९ मध्ये अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांनी आपल्या संपत्तीचा तपशील देताना ६ लाख ७१ हजार रुपये संपत्ती दाखविली होती. म्हणजे २०१७ ते २०१९ या दोनच वर्षात सीमा सावळे यांची संपत्ती १९० टक्के वाढली होती. त्यानंतर आता २०२५ मध्ये त्यांनी आपली संपत्ती तब्बल ३ कोटी २९ लाख २ हजार ५१९ रुपये असल्याचे शपथपत्रात नमूद केले आहे. त्यावरून त्यांची संपत्ती सहा वर्षात तब्बल ४ हजार ३८० टक्के वाढल्याचे स्पष्ट होत आहे.
बालाजीनगरमधील गोरगरीब झोपडीधारकांच्या अनेक पिढ्या आपले आयुष्य गरीबीमध्येच काढत असताना सीमा सावळे यांनी मात्र स्वतःची सहा वर्षांत इतकी प्रचंड आर्थिक भरभराट नेमकी कशी केली, उत्पन्नाचे स्रोत कोणते होते आणि ही वाढ कायदेशीर मार्गानेच झाली का?, असे सवाल आता उघडपणे विचारले जात आहेत. सामान्य माणसाचे उत्पन्न वाढत नाही, पण सत्ताधाऱ्यांची संपत्ती हजारो पटींनी वाढते हे कोणत्या विकासाचे मॉडेल आहे?, असा थेट सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
सामाजिक कार्यकर्ते व जागरूक नागरिकांनी या प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली असून, निवडणूक आयोग आणि संबंधित यंत्रणांनी याची गंभीर दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. लोकशाहीत लोकप्रतिनिधींनी जनतेसमोर पारदर्शक असणे आवश्यक असते. मात्र संपत्तीत झालेली ही ४ हजार ३०० पट वाढ प्रभागातील विकासापेक्षा वैयक्तिक संपन्नतेचाच आलेख दाखवत असल्याचे उघड दिसत आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला या प्रश्नांवर स्पष्ट भूमिका घ्यावीच लागणार असून, प्रभागातील नागरिकांनी अशा नगरसेवकांना पुन्हा पुन्हा निवडून द्यायचे की नाही याचा विचार करण्याची गरज आहे.



