पिंपरी : रावेत, समीर लॉन्स येथील ग्रामदैवत धर्मनाथ महाराज उड्डाणपुलालगत पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गाजवळच्या सेवा रस्त्यावर सुरळीत वाहतुकीसाठी कोणतेही नियोजन नव्हते. त्यामुळे रावेत, किवळे व परिसरातील नागरिकांना प्रचंड वाहतूककोंडीचा सामना करावा लागत होता. तसेच या उड्डाणपुलाजवळ वाहनचालकांचे अपघातही घडत होते. नागरिकांना येणाऱ्या या समस्येची दखल घेत भाजपचे दिपक भोंडवे यांनी ग्रामदैवत धर्मनाथ महाराज उड्डाणपुलाजवळ वाहतूक सिग्नल प्रणाली उभारण्याची मागणी पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पोलिसांच्या वाहतूक विभागाकडे केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेत महापालिका आणि वाहतूक पोलीस विभागाने याठिकाणी सिग्नल उभारले असून, त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. भाजपच्या दिपक भोंडवे यांनी ही समस्या सोडविल्याबद्दल रावेत, किवळे व परिसरातील नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.
रावेत आणि किवळे या परिसरातून पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. त्यामुळे या भागात दररोज प्रचंड मोठ्या प्रमाणात लहान-मोठ्या व अवजड वाहनांची चोवीस तास ये-जा असते. या भागातील नागरिकांना हा महामार्ग ओलांडून ये-जा करण्यासाठी सेवा रस्ते तयार करण्यात आले आहेत. मात्र या सेवा रस्त्यांवर सुरळीत वाहतूक व्हावी यासाठी कोणतेही नियोजन करण्यात आलेले नाही. रावेत, समीर लॉन्स येथील ग्रामदैवत धर्मनाथ महाराज उड्डाणपुलालगत पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गाजवळच्या सेवा रस्त्यावर दररोज सातत्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. तसेच वाहतूक नियोजन नसल्याने वाहनांना अपघातही घडत होते. परिणामी या सेवा रस्त्याचा वापर करणारे रावेत, किवळे आणि परिसरातील नागरिक प्रचंड त्रासले होते. अनेककदा येथील वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका, अग्निशमन दल व इतर अत्यावश्यक सेवांनाही मोठा फटका बसला आहे.
नागरिकांना होणाऱ्या या प्रचंड त्रासाची दखल घेत भाजपच्या दिपक भोंडवे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विद्युत विभागाबरोबरच पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या वाहतूक विभागाकडे ग्रामदैवत धर्मनाथ महाराज उड्डाणपूलाजवळ सेवा रस्त्यावर वाहतूक सिग्नल प्रणाली बसविण्याची लेखी मागणी केली होती. या दोन्ही विभागाशी वारंवार समन्वय साधून सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करून नागरिकांना सुरळीत वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यास सांगितले होते. दिपक भोंडवे यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि वाहतूक पोलीसांनी ग्रामदैवत धर्मनाथ महाराज उड्डाणपुलाजवळ अखेर सिग्नलची उभारणी केली आहे. आता हे सिग्नल लवकरच कार्यान्वित केले जाणार आहे. त्यामुळे या सेवा रस्त्यांवर होणारी वाहतूककोंडी फुटण्यास मदत होणार आहे. त्यामुळे रावेत, किवळे आणि परिसरातील नागरिकांनी भाजपच्या दिपक भोंडवे यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले आहे.